प्रयोगशील व्हा, ब्रँडिंग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:37 IST2017-10-09T01:36:53+5:302017-10-09T01:37:05+5:30

प्रयोगशील व्हा, ब्रँडिंग करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात कौशल्य म्हणजेच हुनरची कमी नाही.परंतु या हुनरसोबतच बाजारात कोणत्या वस्तूला मागणी आहे, हे महत्त्वाचे आहे. वस्तूचा दर्जा आणि मार्केटिंगसोबतच त्याची ब्रँडिंगही करा. नवनवीन तंत्रज्ञान शोधणे आणि त्यात संशोधन करून नवीन वस्तू निर्माण करणे आवश्यक आहे. अशा वस्तूंना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे, त्याची किंमत द्यायलाही लोकं तयार आहेत. तेव्हा कारागिरांनी प्रयोगशील व्हावे, वस्तूची ब्रँडिंग करावी. यासाठी इनोव्हेशन, टेक्नोलॉजी आणि रिसर्चवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
ग्राम ज्ञानपीठ, संपूर्ण बांबू केंद्र, राष्ट्रीय कारीगर पंचायत आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात तीन दिवसीय ‘हुनर खोज यात्रा संवाद व प्रस्तुतिकरण’ आयोजित करण्यात आले होते. रविवारी या कार्यक्रमाच्या समारोपीय समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, डॉ. महेश शर्मा, प्रभाकरराव मुंडले, सुनील देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी करागिरांच्या पाठीशी शासन नेहमीच खंबीरपणे उभे आहे. यासाठीच केंद्र सरकारने कौशल्य विकासासारखे स्वतंत्र मंत्रालयसुद्धा तयार केले असल्याचे स्पष्ट केले. यावेळी डॉ. महेश शर्मा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी देशभरातून आलेल्या विविध कारागिरांचा सन्मान करण्यात आला. किस्टू खडगी, हरिकृष्ण नायक, भय्यालाल शिवारे, रमेश बेहरे, संग्राम भिनारे या कारागिरांना सन्मानित करणयात आले. संचालन श्रद्धा श्रुुत्री यांनी केले. रामकुमार यांनी आभार मानले.
कारागिरांसाठी स्वतंत्र मंत्रालय करा
सुनील देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकेत देशभरातील कारागिरांच्या समस्या विशद केल्या. स्मार्ट शहरात या कारागिरांचे स्थान काय, असा प्रश्न उपस्थित करीत कारागिरांसाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा आयोग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी केली.
बांबू लवकरच देशभरात टीपीमुक्त
आम्ही महाराष्ट्रात बांबू टीपी(ट्रान्सपोर्टेशन पास)मुक्त केला आहे. लवकरच देशभरातही बांबू टीपीमुक्त केला जाईल. राष्ट्रीय बांबूधोरणही लवकरच जाहीर केले जाईल, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.