आता तरी सावधान ! वाघ-बिबट्यांचा घातपातच अधिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST2020-12-06T04:08:22+5:302020-12-06T04:08:22+5:30

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात आणि प्रकल्पांमध्ये मागील ७ वर्षात ३० वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यातील बहुतेक वाघ-बिबट्यांचा ...

Be careful now! More tigers and leopards ... | आता तरी सावधान ! वाघ-बिबट्यांचा घातपातच अधिक...

आता तरी सावधान ! वाघ-बिबट्यांचा घातपातच अधिक...

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात आणि प्रकल्पांमध्ये मागील ७ वर्षात ३० वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यातील बहुतेक वाघ-बिबट्यांचा मृत्यू घातपात आणि अपघाताने झाल्याची नोंद आहे. असे असतानाही पेंच प्रकल्पामध्ये आजही शिकाऱ्यांकडून विजेचे सापळे लावले जात आहेत. यामुळे या वन्यजीवांना वाचविण्यासाठी वनविभाग किती दक्षतेने काम करीत असावा, असा संशयाला वाव असणारा प्रश्न उपस्थित होत आहे.

पेंच प्रकल्पामधील नागलवाडी रेंज फॉरेस्टमध्ये गेल्या महिन्यात १७ नोव्हेंबरला घडलेली घटना या पार्श्वभूमीवर बोलकी ठरावी, अशी आहे. जिप्सीमधून प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे वाहन थेट शिकारी टोळ्यांनी बसविलेल्या विद्युत तारांच्या संपर्कात आले होते. प्रसंग थोडक्यात टळल्याने पर्यटक बचावले. विशेष म्हणजे, पर्यटकांचा वावर असणाऱ्या वनक्षेत्रातच असा प्रकार घडल्याने शिकाऱ्यांचे मनोधर्य किती वाढले असावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात मागील काळात झालेल्या वाघ-बिबट्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीकडे लक्ष वेधणेही महत्त्वाचे ठरले आहे. २०१३ ते नोव्हेंबर २०२० या काळात मागील ७ वर्षात ९ वाघांचा आणि २१ बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी फक्त तीन वाघ आणि चार बिबट्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे. मात्र उर्वरित २३ वाघ-बिबट्यांचा मृत्यू घातपात आणि अपघाताने झाल्याची नोंद आहे. फक्त सात वर्षात एकाच जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने वाघ-बिबट्यांचा मृत्यू घातपात आणि अपघाताने व्हावा, हे गंभीर मानले जात आहे. दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी मुख्य वनसंरक्षक व पेंच व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्ररक्षक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी दोन सदस्यांची स्वतंत्र समिती गठित केली होती. मागील तीन वर्षांत नागलवाडी व परिसरात घडलेल्या घटना तसेच वनविभाग आणि महावितरणने केलेल्या कारवाईचा आढावा घेऊन १ डिसेंबरला ही समिती अहवाल देणार होती. हा अहवाल काय आला या संदर्भात गोवेकर यांच्याशी संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

अशी आहे मृत्यूची आकडेवारी

वर्ष वाघ कारण बिबट कारण

२०१३ ४ घातपात १ घातपात

२०१४ - - ४ घातपात, अपघात

२०१५ १ नैसर्गिक ३ अपघात, नैसर्गिक

२०१६ १ नैसर्गिक ३ नैसर्गिक

२०१७ २ घातपात २ नैसर्गिक, अपघात

२०१८ - - ४ घातपात, अपघात

२०१९ १ नैसर्गिक ३ नैसर्गिक, अपघात, घातपात

२०२० - - १ घातपात

एकूण ९ - २१ -

...

Web Title: Be careful now! More tigers and leopards ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.