पतीच्या मृत्युमुळे दहावीत असलेल्या मुलीचे शिक्षण कसे करावे आणि घर कसे चालवावे या मोठ्या पेचात सापडलेल्या गरीब महिलेने थेट महसूलमंत्र्यांचा जनता दरबार गाठला. नेत्यांच्या दरबारात खरोखरच गरीबाला न्याय मिळेल का ही तिच्या मनात शंका होतीच. मात्र, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केवळ तिची समस्याच ऐकली नाही तर २४ तासांत तिच्या हाती स्वयंरोजगाराचे साधन म्हणून ई-रिक्षाची चावी दिली. तसेच या महिलेच्या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील स्वीकारली. राजकारणी व्यक्तीच्या आतील संवेदनशीलता पाहून महिलेला देखील गहीवरून आले.
दिपाली सावरकर असे संबंधित महिलेचे नाव आहे. त्यांचे पती मिस्त्री म्हणून काम करत होते. त्यांच्या पतीचा अपघात झाला व त्यात ते अपंग झाले. त्यांचे पोट हातावर होते व कामच सुटल्याने दोन वेळच्या जेवणाची समस्या निर्माण झाली. शासकीय मदतीतून ई-रिक्षा मिळाली तर कुटुंब व मुलीचे पालनपोषण होईल असे त्यांना वाटले. दरम्यान, पतीचे निधन झाले आणि त्यांनी नाईलाजास्तोवर मुलीला नातलगांकडे शिक्षणासाठी ठेवले. मात्र त्यांचे मन त्यांना खात होते. काहीही करून स्वत:च्या पायावर उभे राहून मुलीला शिकवायचे हा निश्चय त्यांनी उराशी बाळगला. त्यांना बावनकुळे यांच्या जनता दरबाराबाबत माहिती कळाली. ११ मे रोजी त्यांनी कोराडी येथे जाऊन बावनकुळे यांची भेट घेतली व आपबिती सांगितली. बावनकुळे त्यांची कहाणी ऐकून अस्वस्थ झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांना व मुलीला बोलविले. त्यांनी अचानक दिपाली यांच्या हाती ई-रिक्षाची चाबी दिली व ते पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी मुलीच्या शिक्षणाचीदेखील जबाबदारी घेत असल्याचे त्यांना सांगून आश्वस्त केले. बावनकुळे यांच्यातील संवेदनशीलता पाहून दिपाली भारावून गेल्या होत्या.