‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सिनेमा फिक्शन नव्हे तर फॅक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:22 IST2021-02-20T04:22:18+5:302021-02-20T04:22:18+5:30
- रमेश थेटे : सिनेमा प्रदर्शित होताच सामाजिक सलोखा निर्माण होईल लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इतिहासातील भीमा कोरेगावची ...

‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सिनेमा फिक्शन नव्हे तर फॅक्ट
- रमेश थेटे : सिनेमा प्रदर्शित होताच सामाजिक सलोखा निर्माण होईल
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतिहासातील भीमा कोरेगावची लढाई आता रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे. सुमारे २०० वर्षापूर्वी १८१८ मध्ये घडलेला हा घटनाक्रम माजी आयएएस अधिकारी रमेश थेटे यांनी ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात मांडला आहे. हा बहुचर्चित हिंदी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज असून, लवकरच प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा होणार आहे. हा सिनेमा काल्पनिक किंवा मनगढंत कथांवर अर्थात फिक्शन नाही तर वास्तवातील घटनांचा शोध, अभ्यास करून साकारलेला वास्तववादी सिनेमा असल्याचे निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार रमेश थेटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भीमा कोरेगाव हा वर्तमानात प्रचंड वादाचा विषय आहे. एका अर्थाने समाजात दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे, नेमके सत्य काय ते या चित्रपटातून पुढे येईल. भीमा कोरेगावचा लढा हा कोण्या समाजाविरुद्ध नसून ती आत्मसन्मानाची लढाई होती, हेच या इतिहासाच्या दाखल्यांवरून स्पष्ट होते. हा सिनेमा हीच फॅक्ट सादर करेल. त्यामुळे, दोन समाजातील तेढ दूर होऊन सामाजिक सलोखा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे रमेश थेटे म्हणाले.
‘तुम्हाला तुमचा इतिहास माहीत नसेल तर तुम्ही इतिहास घडवू शकत नाही’. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ साली भीमा कोरेगाव स्मारकाला भेट दिली होती, तेव्हा म्हटले होते. तोच धागा पकडून हा चित्रपट बनवला आहे. इतिहास सांगायचा असेल तर आजच्या घडीला चित्रपटाशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही. मनोरंजनासोबत सत्य घटनाक्रम आणि प्रबोधन याचा ताळमेळ साधत हा चित्रपट बनवल्याचे ते म्हणाले. गेल्या पाच वर्षापासून चित्रपटाची तयारी सुरू होती. मोडी लिपी तज्ज्ञ पुण्याचे अशोक नागरे, दत्ता नलावडे, प्रा. प्रेम हनुवते यांच्यासारख्या अनेक इतिहासकार, संशोधक, या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या ब्रिटिश कॅप्टन स्टॉन्टन याची दैनंदिनी व तत्कालीन नोंदकारांच्या दस्तऐवजांचा आधार घेऊन हा सिनेमा रुपेरी पडद्यावर उतरला आहे. मी स्वत: २५ वर्षापासून संगीतक्षेत्राशी जुळलो असल्याने कलाक्षेत्र जवळून ओळखून असल्याचे थेटे म्हणाले.
------------
संकल्पना, गीत, संगीत, दिग्दर्शन व निर्मिती
रमेश थेटे हे गेले ३५ वर्ष आयएएस अधिकारी म्हणून शासकीय सेवेत होते. मध्य प्रदेशचे प्रधान सचिव म्हणून ते जुलै २०२० मध्ये निवृत्त झाले. शासकीय सेवेत असतानाही संगीत क्षेत्राशी जवळीक साधली होती. त्यांची अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’च्या कथेची संकल्पना, पाचही गीत, संगीत, गायन, चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मिती स्वत: थेटे यांनी केली आहे. रमेश थेटे फिल्म्स अंतर्गत हा बिग बजेट सिनेमा साकारला गेला आहे. विशेष म्हणजे, याचे हेडक्वॉर्टर नागपूर आहे.
-----------
बॉलिवूडचे नामांकित कलावंत
केंद्रीय भूमिका प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल याची असून, दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री दिगांगणा सूर्यवंशी, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, अभिमन्यू सिंग, मिलिंद गुणाजी, गोविंद नामदेव, यतीन कारेकर आदींच्या भूमिका आहेत. प्रख्यात कोरिओग्राफर गणेश आचार्य, आर्ट डिझाईन नितीन देसाई, डीओपी कबीर लाल, ॲक्शन अब्बास अली मुगल, संगीत ललित सेन व रमेश थेटे यांचे आहे. गाणी सोनू निगम, श्रेया घोषाल, हरिहरन, जावेद अली व रमेश थेटे यांनी गायली आहेत. पटकथा विशाल विजयकुमार, अरुण शिंदे व सुबोध नागदिवे यांची आहे.
-------------
पुण्यात १७९५ ते १८१८ या काळात अस्पृश्यांवर प्रचंड अत्याचार वाढले होते. राज्यकर्त्यांमध्ये न्याय देण्याची दानत संपली होती. समतेच्या लढाईत लक्ष्य ठरले असेल तर शक्ती पणाला लागते आणि ती संधी १८१८ मध्ये सापडली. त्या असंतोषाची ऊर्जा ज्वालामुखीत रुपांतरित झाली, त्याचे नाव ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ होय. ही लढाई जातीविरुद्ध नव्हती तर वृत्तीविरुद्ध होती, हे महत्त्वाचे.
- रमेश थेटे : दिग्दर्शक, निर्माता
..............