छत्तीसगडच्या बुकींची नागपुरातून डावबाजी
By Admin | Updated: January 8, 2017 02:12 IST2017-01-08T02:12:32+5:302017-01-08T02:12:32+5:30
छत्तीसगडमधील कुख्यात बुकींनी नागपुरात येऊन क्रिकेटचे बेटिंग सुरू केले. काही पोलिसांशी हातमिळवणी करून सुरू झालेल्या

छत्तीसगडच्या बुकींची नागपुरातून डावबाजी
क्रिकेट सट्ट्याच्या पॉश अड्ड्यावर धाड
नागपूर : छत्तीसगडमधील कुख्यात बुकींनी नागपुरात येऊन क्रिकेटचे बेटिंग सुरू केले. काही पोलिसांशी हातमिळवणी करून सुरू झालेल्या या क्रिकेट अड्ड्यावर सहायक पोलीस आयुक्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री धाड घातली आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आठ बुकींनाही जेरबंद केले.
गिट्टीखदानमधील फ्रेण्डस् कॉलनीत क्रिकेट सट्ट्याचा अड्डा सुरू असून, येथे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय बुकी बसले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्तांना मिळाली. त्या आधारे एसीपी वाघचौरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास या पॉश अड्ड्यावर धाड घातली. यावेळी येथे आठ बुकी क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यावर खयवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून ७१ मोबाईल, टीव्ही, रेकॉर्डिंग मशिन असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
खयवाडी करणारे छत्तीसगडमधील बुकी निशांत किशोर नागवाणी (वय २५, रा. कृष्णा कॉलनी, भाटापारा), अजय दयालदास चावला (वय २२, रा. सुदर, रायपूर), दीपक परसराम आहुजा (वय २२, रा. भईपारा, लाखेनगर, रायपूर), सतवीर सतनामदास बजाज (वय २८, रा. बजाजभवन, रायपूर), विशाल लक्ष्मणदास आहुजा (वय २७, रा. लाकानगर, भुईपारा, रायपूर), हितेश नानकराम चावला (वय २४, रा. लक्कावाडा, भगत चौक धमतरी), इंद्रकुमार भावनदास छुवानी (वय ४५, रा. सुदर गजबा, सिंधी मोहल्ला, धमतरी) आणि चंदन हेमंतदास बाखरेजा (वय २९, रा. रामनगर, रायपूर) यांना पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त राकेश कलासागर, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे, ठाणेदार आर. डी. निकम, सहायक निरीक्षक प्रशांत जुमडे, उपनिरीक्षक गोडबोले, मदनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.(प्रतिनिधी)
पोलिसांना दीड लाख, घरमालकाला २५ हजार
नागपूर हे क्रिकेट सट्ट्याचे मध्यभारतातील महत्त्वाचे सेंटर आहे. येथील बुकींचे देशविदेशात कनेक्शन असून, तेच परप्रांतीय बुकींना बोलवून नागपुरातून क्रिकेट सट्ट्याचा बाजार मांडतात. ठराविक बुकींची शहर पोलीस दलातील काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी साटेलोटे आहे. महिन्याला ते लाखोंची देण देऊन पोलिसांना कारवाईपासून दूर ठेवतात. त्यांच्याच माध्यमातून २५ हजार रुपये प्रतिमहिना भाड्याची सदनिका घेऊन हा अड्डा सुरू करण्यात आला होता. बुकींकडून पोलिसांना दीड लाख रुपये महिन्याची देण जात होती, अशीही सूत्रांची माहिती आहे. नागपुरातील खामला, वर्धमाननगर, गांधीबाग आणि जरीपटका कनेक्शनही यानिमित्ताने सट्टाबाजारात चर्चेला आले आहे.
सीमसाठीही बनवाबनवी
पोलिसांनी पकडलेल्या बुकींचा म्होरक्या अमित विरा असून, तो दुर्ग (भिलाई, छत्तीसगड) येथे बसतो. त्याच्याकडेच आम्ही या सट्ट्याची खयवाडी करीत होतो, अशी कबुली प्राथमिक तपासात बुकींनी दिल्याचे समजते. विशेष म्हणजे, या बुकींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल व्यतिरिक्त २० सीमकार्ड आढळले. ते सर्वच्या सर्व दुसऱ्याच्या कागदपत्राच्या आधारे (बनावट नावाने) घेण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या बुकींविरुद्ध फसवणुकीच्या कलम ४२० अन्वयेसुद्धा गुन्हा दाखल केला आहे.