मानेवाडा घाटावर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:09 IST2021-04-30T04:09:52+5:302021-04-30T04:09:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमित रुग्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शुल्क घेतले जात असल्याचे पुढे येताच, मनपा आयुक्तांनी ...

मानेवाडा घाटावर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमित रुग्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शुल्क घेतले जात असल्याचे पुढे येताच, मनपा आयुक्तांनी मंगळवारी आदेश जारी करीत अंत्यसंस्कारासाठी कसलेही शुल्क घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी मानेवाडा घाटावर पालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे चित्र आहे.
पिपळा निवासी दिलीप शाहू (५८) यांचे बुधवारी सकाळी ७ वाजता हुडकेश्वर येथील बोरकर हॉस्पिटलमध्ये कोरोना संक्रमणावरील उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार मनपाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व प्रक्रिया पार पाडत ॲम्ब्युलन्समध्ये पार्थिव मानेवाडा घाट येथे नेले. तेथे पोहोचल्यावर संबंधित घाट निरीक्षकांनी दिलीप शाहू यांचे पुत्र नीलेश शाहू यांना लाकडाचे शुल्क भरण्यास सांगितले. नीलेश यांनी प्रतिवाद घातला असता आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट असेल तरच लाकडे नि:शुल्क उपलब्ध होतील, असे स्पष्ट केले. मात्र, बोरकर हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये व एचआरसीटी स्कोर रिपोर्टमध्ये कोविड संक्रमणाचा उल्लेख होता. मात्र, ते गृहित धरले जात नसल्याचे सांगत घाट कर्मचाऱ्यांनी शाहू यांच्याकडून पैसे वसूल केल्याचे उघड झाले आहे.
----------------
कोविड नव्हता तर प्रोटोकॉल कसला
घाटवाले म्हणतात की, बॉडी कोविडची नव्हती तर मग मनपाने कोविड प्रोटोकॉल का पाळले. आम्हाला पार्थिव दिले असते तर आम्ही स्वत: अंत्यसंस्कार पार पाडले असते. मात्र, हॉस्पिटलमधून ॲम्ब्युलन्समध्ये टाकून मनपा कर्मचारी पार्थिव घाटापर्यंत नेतात. त्यासाठी ५०० रुपये मागतात आणि घाटावर नॉन काेविड बॉडी म्हणून लाकडाचे पैसेही मागतात, हा प्रकार समजण्यापलीकडचा आहे.
- शैलेंद्र ओझा, गावकरी, पिपळा
-----------------
पावतीस नकार, लाकडातही भ्रष्टाचार
जास्त वादावादी नको म्हणून लाकडाचे पैसे भरले. ३०० किलो लाकडाचे पैसे भरल्यावर दिले. मात्र २८० किलो लाकूड. विशेष म्हणजे, पावती देण्यासही आनाकानी केली जात होती. अखेर पाणी डोक्यावर चालले म्हणून आम्ही वाद घालण्यास सुरुवात केल्यावर पावती देण्यात आली. अशा तऱ्हेने गौडबंगाल होत असल्याचे उघडउघड स्पष्ट आहे.
- नीलेश शाहू, मृताचे पुत्र, पिपळा
....................