पीएचडी’ संशोधकांना ‘अॅप’चा आधार
By Admin | Updated: January 7, 2017 21:17 IST2017-01-07T21:17:03+5:302017-01-07T21:17:03+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘ई’ सुधारणांकडे आणखी एक पाऊल टाकले आहे. ‘पीएचडी’ संशोधकांसाठी विद्यापीठाने विशेष ‘अॅप’ तयार केले आहे

पीएचडी’ संशोधकांना ‘अॅप’चा आधार
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ७ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘ई’ सुधारणांकडे आणखी एक पाऊल टाकले आहे. ‘पीएचडी’ संशोधकांसाठी विद्यापीठाने विशेष ‘अॅप’ तयार केले आहे. या ‘अॅप’च्या मदतीने प्रबंध सादर केल्यानंतर त्याच्या मूल्यमापनाचा वेग व नेमकी स्थिती उमेदवारांना एका ‘क्लिक’वर जाणून घेता येणार आहे हे विशेष.
नागपूर विद्यापीठाच्या ‘पीएचडी’ नोंदणीची प्रक्रिया ‘आॅनलाईन’ झाली आहे. शिवाय ‘पीएचडी’चा दर्जा वाढावा यासाठी विद्यापीठातर्फे ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) २ टप्प्यांत घेण्यात येत आहे. मात्र प्रक्रियेत जरी सुधारणा झाली असली तरी शोधप्रबंध सादर केल्यानंतर ‘पीएचडी’ संशोधकांचा मन:स्ताप वाढत असल्याचे चित्र दिसून येते. प्रबंधाचे मूल्यमापन कुठपर्यंत आले, प्रबंधाची नेमकी स्थिती काय आहे, बैठकीनंतर कुठले ‘पॅनल’ लागले इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी उमेदवारांना प्रचंड पायपीट करावी लागते. शिवाय विद्यापीठातून त्यांना लगेच उत्तर मिळेल, याचीदेखील शाश्वती नसते. त्यामुळे प्रबंध सादर केल्यानंतरदेखील उमेदवारांवरील तणाव जात कायम राहतो.
हीच बाब लक्षात घेऊन नागपूर विद्यापीठाने एक पाऊल पुढे उचलत आता विशेष मोबाईल ‘अॅप’ तयार केले आहे. ‘आरटीएमएनयू पीएचडी स्टेटस ट्रॅक’ या नावाचे हे ‘अॅप’ असून हे ‘गूगल प्लेस्टोअर’वर मोफत उपलब्ध आहे. या ‘अॅप’मुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे व त्यांची पायपीट थांबणार आहे.
काय आहे ‘अॅप’मध्ये ?
संबंधित ‘अॅप’ हे शोधप्रबंध केलेल्या उमेदवारांच्या समस्या लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवाराला ‘पीएचडी सेल’कडून ‘यूझर नेम’ व ‘पासवर्ड’ देण्यात येणार आहे. त्या मदतीने हे ‘अॅप’ सुरू केल्या जाऊ शकते. शोधप्रबंध सादर करण्याची दिनांक, त्यानंतर मूल्यमापनाचे पुढील टप्पे, विविध बैठकांमधील निर्णय, परीक्षकांचे ‘पॅनल’, प्रत्यक्ष मूल्यमापनाची स्थिती, विद्यापीठाच्या अधिसूचना, इत्यादी माहिती उमेदवारांना लगेच उपलब्ध होणार आहे.
आणखी सुधारणा करणार : प्र-कुलगुरू
‘पीएचडी’ प्रणाली जास्तीत जास्त पारदर्शक करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यातूनच या ‘प्रोमार्क’च्या मदतीने ‘अॅप’ची निर्मिती करण्यात आली आहे. या ‘अॅप’मुळे ‘पीएचडी’ संशोधकांना शोधप्रबंधाची सर्व माहिती सहज उपलब्ध होणार आहे. शिवाय विद्यापीठाच्या कार्यप्रणालीलादेखील गती येईल. या ‘अॅप’मध्ये भविष्यात आणखी सुधारणा करण्यात येतील, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.