नागपूरच्या राजभवनातही तळघर
By Admin | Updated: August 19, 2016 02:27 IST2016-08-19T02:27:13+5:302016-08-19T02:27:13+5:30
राज्यातील सर्वात मोठे राजभवन अशी नागपूरच्या राजभवनाची ओळख आहे. मुंबईतील राजभवनात ब्रिटिशकालीन भुयार सापडल्यानंतर...

नागपूरच्या राजभवनातही तळघर
मौलिक वस्तूंचा साठा : जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, चांदीच्या भांड्यांचा समावेश
वसीम कुरेशी नागपूर
राज्यातील सर्वात मोठे राजभवन अशी नागपूरच्या राजभवनाची ओळख आहे. मुंबईतील राजभवनात ब्रिटिशकालीन भुयार सापडल्यानंतर नागपुरातील राजभवनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील राजभवनातदेखील भुयार असून येथील तळघराला ‘सिल्व्हर गोडावून’ या नावाने ओळखले जाते. या तळघरात चांदीची अनेक किंमती भांडी ठेवली आहेत. याशिवाय येथे जैन धर्माच्या तीर्थंकरांच्या अनेक वर्षे जुन्या मूर्तीदेखील ठेवण्यात आल्या आहेत.
१८९१ साली बनविण्यात आलेली ही दिमाखदार इमारत ब्रिटिश शासनकाळात सीपी अॅन्ड बेरार प्रांताच्या ‘हाय कमिश्नर’चे कार्यालय होती. एकूण २१ एकर परिसरातील या जागेत २२ हजार चौरस फुटात इमारतीचे बांधकाम झाले आहे. या इमारतीत ५० कक्ष आहेत. तर इमारतीच्या तळघरात १५ बाय १५ चे ३ कक्ष आहेत. ब्रिटिशांच्या काळापासूनच या तळघरात मौलिक मूर्ती व चांदीची भांडी ठेवली आहेत. इमारतीच्या काही कामासाठी १० वर्षांअगोदर राज्य पुरातत्व विभागाची परवानगी घेण्यात आली होती. यानंतर कुठल्याही बाहेरील ‘एजन्सी’ने इमारतीसंदर्भात कुठलीही माहिती घेतलेली नाही.
‘हेरिटेज’ समितीचा दावा खोटा
रमेश येवले यांनी दिलेल्या माहितीनुसार या ‘हेरिटेज’ इमारतीचे प्रलेखन करायला कुणीही आलेले नाही. दुसरीकडे मनपाच्या ‘हेरिटेज’ समितीच्या पदाधिकारी उज्ज्वला चक्रदेव यांनी या इमारतीचे प्रलेखन झाले असल्याचा दावा केला आहे. या इमारतीला घेऊन राज्य पुरातत्व विभाग व भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनेदेखील कुठलेही संशोधन केलेले नाही. तज्ज्ञांच्या मते अशा जागांवर अनेक विशेषता दिसून येऊन शकतील. उपग्रहाच्या छायाचित्रातूनदेखील काही गोष्टींची माहिती मिळते. परंतु राज्यपालांचे निवासस्थान असल्यामुळे येथे कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही.
नागपुरातून मुंबईत जातात भांडी
नागपूरचा राजवाडा या नावाने प्रसिद्ध असलेल्या राजभवनाच्या तळघरात ठेवण्यात आलेली भांडी विशेष प्रसंगी मुंबईच्या राजभवनात नेण्यात येतात. ही सर्व शाही भांडी असून यांचे वजन जास्त आहे. राजभवनाच्या तळघरात चांदीची भांडी व जैन तीर्थंकराच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यांची नियमितपणे स्वच्छता होते. आतापर्यंत येथे कुणीही कागदी कारवाईसाठी आलेले नाही, अशी माहिती राजभवनाचे अतिरिक्त ‘कंट्रोलर’ रमेश येवले यांनी दिली.