‘बीएस्सी’च्या विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा!
By Admin | Updated: July 22, 2015 03:26 IST2015-07-22T03:26:54+5:302015-07-22T03:26:54+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील २ ते ३ हजार बीएसस्सीच्या (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

‘बीएस्सी’च्या विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा!
नागपूर विद्यापीठ : दुसऱ्या वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात मिळणार प्रवेश
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील २ ते ३ हजार बीएसस्सीच्या (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. दुसऱ्या वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. ‘बीएसस्सी’ला सत्र प्रणाली लागू करण्यात आली आहे. परंतु जुन्या अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थ्यांचे दुसऱ्या वर्षाचे काही विषय निघाले होते. नियमांनुसार ते ‘एटीकेटी’च्या माध्यमातून तृतीय वर्षाच्या सत्रात प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत. परंतु ‘बीएसस्सी’ला सत्र प्रणाली लागू करताना विद्यापीठाने काढलेल्या एका ‘अध्यादेशानुसार असे विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र नाहीत. सत्र प्रणालीनुसार तृतीय सत्रात अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला पाचव्या सत्रात प्रवेश देणे शक्य नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच विद्यार्थ्यांनी यासंदर्भात विद्यापीठावर धडक दिली होती व प्र-कुलगुरूंसमोर हा मुद्दा मांडण्यात अला होता. विद्यार्थ्यांची बाजू योग्य असून याबाबत अभ्यास मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यांच्या प्रवेशासंदर्भात बुधवारी अध्यादेश जारी करण्यात येईल, असे प्र-कुलगुरूंनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
अटींचे पालन करण्याचे ‘एमकेसीएल’ला निर्देश
दरम्यान,नागपूर विद्यापीठात प्रवेशाची नोंदणी होताक्षणीच विद्यार्थ्यांना ‘एसएमएस’ प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांना ‘ई-सुविधेचे सर्व फायदे मिळाले पाहिजेत व काटेकोरपणे सामंजस्य करारातील अटींचे पालन झाले पाहिजे, असे विद्यापीठ प्रशासनाने ‘एमकेसीएल’ला बजावले आहे.देयकांवरुन वादात सापडलेले नागपूर विद्यापीठ व ‘एमकेसीएल’दरम्यानचा सामंजस्य करार कायम राहणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. परीक्षेच्या अगोदरची व नंतरची सर्व कामे ‘एमकेसीएल’कडे सोपविण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या नोंदणीपासून ते पदवी प्रमाणपत्र जारी करण्यापर्यंतच्या प्रक्रियांचा समावेश आहे. केवळ उत्तरपत्रिका ‘स्कॅनिंग’ व ‘आॅन स्क्रीन’ मूल्यांकनासाठी विद्यापीठाला बाहेरील एजन्सीची मदत घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी विद्यापीठातील घडामोडींची माहिती कळावी यासाठी ‘एसएमएस’ सुविधा ‘एमकेसीएल’कडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नोंदणी झाली की लगेच त्यांना ‘एसएमएस’ जाणार आहे. सोबतच विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक, विविध सूचना, निकाल यांची माहितीदेखील विद्यार्थ्यांना घरबसल्या कळणार आहे.