गीता शेजवळ, गायकवाडविरुद्ध खटला दाखल करण्यास मनाई; हायकोर्टाचा आदेश
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 16, 2024 18:10 IST2024-02-16T18:09:03+5:302024-02-16T18:10:46+5:30
प्रकरणाच्या तपासाचा मार्ग मोकळा ठेवला.

गीता शेजवळ, गायकवाडविरुद्ध खटला दाखल करण्यास मनाई; हायकोर्टाचा आदेश
राकेश घानोडे, नागपूर : सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्याच्या बहुचर्चित प्रकरणातील आरोपी मोटार वाहन निरीक्षक गीता भास्कर शेजवळ व संकेत भारत गायकवाड यांना शुक्रवारी अंतरिम दिलासा मिळाला. या दोघांविरुद्ध पुढील आदेशापर्यंत खटला दाखल करू नका, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला सांगितले. प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याचा मार्ग मात्र मोकळा ठेवण्यात आला.
१२ जानेवारी २०२४ रोजी बजाजनगर पोलिसांनी शेजवळ व गायकवाडविरुद्ध भादंवितील कलम ३०७ व शस्त्र कायद्यातील कलम ३/२५ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. तो एफआयआर रद्द करण्यासाठी या दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता हा अंतरिम आदेश दिला व राज्य सरकारला नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देशदेखील दिले.
शेजवळ सध्या अहमदनगर तर, गायकवाड पिंपरी-चिंचवड येथे कार्यरत आहेत. ५ मे २०२२ रोजी सकाळी ६:४५ च्या सुमारास सर्व्हिस रिव्हॉल्व्हरची एक गोळी गायकवाड यांच्या डाव्या पायाच्या पोटरीमधून आरपार निघून उजव्या पायाच्या पोटरीमध्ये जाऊन फसली होती. सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खाली पडल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा त्यावेळी गायकवाड यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये ती गोळी शेजवळ यांनी झाडल्याचे स्पष्ट झाले, असे सरकारचे म्हणणे आहे. बजाजनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये गायकवाड यांचे घर आहे. त्या ठिकाणी ही घटना घडली होती. आरोपींतर्फे ॲड. शशांक मनोहर व ॲड. समीर सोनवणे यांनी कामकाज पाहिले.