वस्त्यांमध्ये लावाल बार...तर खबरदार !
By Admin | Updated: April 9, 2017 02:08 IST2017-04-09T02:08:31+5:302017-04-09T02:08:31+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महामार्गावरील बार, वाईन शॉप, देशी दारूची दुकाने बंद झाली.

वस्त्यांमध्ये लावाल बार...तर खबरदार !
महिला लोकप्रतिनिधींचा एल्गार : दारूचे दुकान उधळून लावू
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महामार्गावरील बार, वाईन शॉप, देशी दारूची दुकाने बंद झाली. आता ही दुकाने वस्त्यांमध्ये सुरू करण्यासाठी संबंधितांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे सामाजिक आरोग्य बिघडण्याचा तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. यामुळे वस्त्यांमध्ये येऊ घातलेल्या या दारू दुकानांना ताकदीने विरोध करण्यासाठी महिला लोकप्रतिनिधी पुढे आल्या आहेत. वस्त्यांमध्ये बार लावाल तर खबरदार !... असा इशारा महिला लोकप्रतिनिधींनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग व राज्यमार्गावरील दारू दुकाने हटविण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्हच आहे. अनेक ट्रकचालक दारू पितात. याचा त्यांच्या घरच्या महिलांना त्रास होतो. अपघाताची शक्यता असते. न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक महिलांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचले आहेत. आता ही दारूची दुकाने वस्त्यांमध्ये सुरू होऊन यात भर पडणार असेल तर एक महिला महापौर म्हणून मी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल. नागरी वस्त्यांत दारूची दुकाने सुरू झाल्यास महिला व युवतींना याचा त्रास होणार आहे. त्यामुळे वस्त्यांमध्ये ही दुकाने सुरू करून सामाजिक आरोग्य बिघडवू नये. यासंदर्भात महिलांची तक्रार आल्यास त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील.
- नंदा जिचकार , महापौर
लोकमतच्या मोहिमेनंतर
नगरसेवकांकडे तक्रारी
महामार्गावर बंद झालेले बार, वाईन शॉप आता वस्त्यांमध्ये सुरू होऊ नये, अशी लोकहिताची भूमिका लोकमतने घेतली. या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. नागरिकांमध्ये या विषयी जागरुकता निर्माण झाली असून आपल्या भागात दारूची दुकाने सुरू होऊ द्यायची नाहीत, असा निर्धार करील लोक एकत्र येऊ लागले आहेत. काही नगरसेवकांकडे नागरिक, महिलांची शिष्टमंडळे पोहचू लागली आहेत. वस्तीत दारूचे दुकान सुरू होणार असेल तर विरोधासाठी तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ, असे साकडे नगरसेवकांना घालत आहे. त्यामुळे येत्या काळात नागपुरात एक मोठी लोकचळवळ उभी राहील, अशी चिन्हे आहेत.