Ganesh Visarjan 2019 : बाप्पा तुझा विरह नको, पुढच्या वर्षी लवकर ये हं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 09:03 PM2019-09-13T21:03:40+5:302019-09-13T21:17:29+5:30

बापा, तुझा विरह सहन होत नाही रे.. तू जाऊ नकोस तर, पुन्हा परत येण्यासाठी पुढच्या प्रवासाला निघ... पुढच्या वर्षी लवकरच ये हं... गणपती बाप्पा मोरया... अशा आर्त हाकेचा गजर करत भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पा मोरयाला गुरुवारी जोशपूर्ण आवेशात निरोप दिला.

Bappa Tuza Virah Nako, Pudhchya Varshi Lavkar Ye H | Ganesh Visarjan 2019 : बाप्पा तुझा विरह नको, पुढच्या वर्षी लवकर ये हं

Ganesh Visarjan 2019 : बाप्पा तुझा विरह नको, पुढच्या वर्षी लवकर ये हं

googlenewsNext
ठळक मुद्देभावसुमनांजली अर्पण करत, मोरयाला भक्तांचा निरोपजोश, जल्लोष आणि संयमात पार पडले विसर्जन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तू असतोस कायम सोबतच.. पण, व्यस्ततेत जाणीव नसते रे बाबा. तू तर सर्वव्यापी. तुझे असणे आमच्या जाणिवेत असावे ना.. म्हणून तर, तुला पाहुणचार घालायला, तुझे सगळे लाड पुरवायला.. तुझे आमच्यात, आमच्यासारखे, आमच्या कल्पनेप्रमाणे असणे गरजेचे आहे ना.. म्हणून तर हा सगळा प्रताप. आमच्या या आर्त भावनेचा मान ठेवत तू आलास.. आत्ता कसे.. लई आनंद झाला बाप्पा.. पण, तू आता निघालास पुन्हा सर्वव्यापी व्हायला.. मग, जरा मन हेलावणारच नां... बापा, तुझा विरह सहन होत नाही रे.. तू जाऊ नकोस तर, पुन्हा परत येण्यासाठी पुढच्या प्रवासाला निघ... पुढच्या वर्षी लवकरच ये हं... गणपती बाप्पा मोरया... अशा आर्त हाकेचा गजर करत भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पा मोरयाला गुरुवारी जोशपूर्ण आवेशात निरोप दिला.  

शहरात बाप्पाचे आगमन जसे धडाक्यात होते. तसेच त्याला निरोपाचा सोहळाही दणक्यात झाला. ढोल-ताशांचा गजर, सनई-चौघड्यांचा सूर, पुष्पांची उधळण अन् हेलकावे खाणाऱ्या मनाची चलबिचल.. असे वातावरण अनंत चतुर्दशीला शहरात दिसून आले. ताल, सूर, रंग, उत्साह अन् भावनांचा पवित्र संगम उपराजधानीत बघायला मिळाला.

एक मात्र विशेष होते... स्वच्छता! दरवर्षी होणारी बाप्पांच्या मूर्तींची हयगय, निर्माल्याची हेडसांड अन् तलावांशेजारी असणारी घाण.. यंदा कुठेच दिसली नाही. याचा अर्थ गणपती बाप्पाची गुणपती चेतना भक्तांनी आत्मसात केली. 


मनपाची यंत्रणा फुटाळ्यावर सज्ज
शहरातील फुटाळा तलाव मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनाचे एकमात्र स्थळ होते. त्यामुळे अख्ख्या महापालिका प्रशासनाचे लक्ष हे फुटाळा तलावावर होते. मोठ्या संख्येने विसर्जन होत असल्याने फुटाळा तलाव प्रदूषित होईल, हे निश्चित होते. पण तलाव कमीत कमी प्रदूषित व्हावा या दृष्टिकोनातून महापालिकेची यंत्रणा येथे कार्यरत होती. मनपाच्या आरोग्य विभागाचे ८० तर लोककर्म विभागाचे ५० कर्मचारी येथे कार्यरत होते. १० कृत्रिम टँक ठेवण्यात आले होते. ३० च्यावर निर्माल्य संकलनाचे कलश ठेवले होते. या व्यतिरिक्त १ पोकलॅण्ड, मोठ्या गणपतीच्या विसर्जनासाठी ३ क्रेन, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन यंत्रणा, अ‍ॅम्ब्युलन्स येथे तैनात करण्यात आली होती. तलावाच्या परिसरात कुठेही कचरा दिसणार नाही, म्हणून मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्यात येत होती. घरगुती गणपती विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, यासाठी मनपाचे अधिकारी गणेशभक्तांना विनंती करीत होते. तीन शिफ्टमध्ये तलावावर कर्मचारी तैनात करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर तलाव स्वच्छ करण्याची मोहीम सुरू होती. धरमपेठ झोनचे सहा. आयुक्त प्रकाश वराडे, आरोग्य निरीक्षक दीनदयाल टेंभेकर, लोककर्म विभागाचे उपअभियंता अजय डहाके या सर्वांचे संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण होते.
चोख सुरक्षा व्यवस्था
गणेश विसर्जनादरम्यान फुटाळा तलावावरील प्रत्येक हालचालीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत होती. त्याचबरोबर संपूर्ण फुटाळा परिसरात ९७ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तलावाच्या एक किलोमीटरच्या परिसरातून वाहतूक थांबविण्यात आली होती. मोठी पोलीस कुमक तलावावर तैनात होती. त्यामुळे शांततेत आणि शिस्तीत विसर्जन पार पडले.
गांधीसागर कल्याणकारी संस्थेचा हातभार
महापालिके ने गांधीसागर तलावावर विसर्जनासाठी बंदी केली होती. पण विसर्जनासाठी येणाऱ्या घरगुती गणपतींसाठी १५ कृत्रिम टँक लावण्यात आले होते. महापालिकेचे कर्मचारी आणि परिसरातील गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेच्या मदतीने या तलावातही मूर्तींचे विसर्जन झाले नाही. निर्माल्य संकलन, गणपतीचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करून घेण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर, उपाध्यक्ष शंकरराव हेडाऊ यांच्यासह गुडू तिवारी, धीरज वाघ, हेमंत बेहेरखेडे, देवाजी नेरकर, राजेंद्र जयस्वाल, प्रशांत चलपे, मुकुंद पंडवंसी, श्याम दंतुलवार, राजू दैवतकर, राजेश पुरी, प्रमोद ठाकरे, अशोक सावरकर, किशोर जयस्वाल, दीपक जयस्वाल, प्रकाश मोतेवार यांचे सहकार्य लाभले.
अनंत चतुर्दशीमुळे घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सकाळपासूनच सुरुवात झाली होती. सकाळच्या सुमारास बहुतांश घरगुती गणपतींचे विसर्जन त्यांच्या परिसरातील कृत्रिम टँकमध्ये करण्यात आले होते. त्यामुळे तलावावर दुपारपर्यंत विशेष गर्दी दिसली नाही. मात्र दुपारनंतर मंडळाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. फुटाळ्यावर भक्तांची गर्दी होऊ लागली. वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनीअरींग कॉलेज, कॉर्पोरेट ऑफिस, पोलीस ठाण्यातील गणपती, मंडळाच्या गणपतींच्या विसर्जनाचा ओघ वाढला आणि फुटाळा गणेशभक्तांनी फुलून गेला. इतर तलावांवर विसर्जनाला बंदी असली तरी, कृत्रिम टँक ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे घरगुती गणपतीही वाजत गाजत, मिरवणुकीसह येत होते. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत या सोहळ्यात चिंब भिजले होते. पण यंदाच्या विसर्जनादरम्यान नागरिकांनी स्वच्छता व शिस्तीचे कटाक्षाने पालन केल्याचे दिसून आले. पर्यावरण रक्षणासाठी अनेक घरगुती गणपतींचे विसर्जन तर कृत्रिम टँकवर करण्यात आले. एकूणच विनायकाला निरोप देताना नागपूरकरांचे खरे ‘स्पिरीट’ दिसून आले.
श्री गणेश ई-गणेश!
मातीच्या गणरायाचे अर्थात श्रीगणेशाचे जसे विसर्जन झाले तसेच सायबरविश्वातही विसर्जन झाले. अर्थात हे गणराय होते ई-गणेश! फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप तसेच इतरही सोशल नेटवर्किंग साईटस्वर मागील दहा दिवसांपासून या सोहळ्याची धूम होती. सकाळपासूनच ‘नेटीझन्स’नी विसर्जनाच्या विविध ‘पोस्ट’ टाकण्यास सुरुवात केली होती.
बाप्पासोबत सेल्फी 

फुटाळा तलावावर गणेश विसर्जनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. गणेश विसर्जनासोबतच तरुणाईमध्ये उत्साह दिसून आला तो ‘सेल्फी’चा. लाडक्या बाप्पाला निरोप देत असताना तरुण-तरुणींचे घोळके गणरायाच्या मूर्तीसोबत ‘सेल्फी’ काढताना दिसत होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच घरगुती गणपतींचेदेखील येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी ‘फॅमिली सेल्फी’देखील दिसून आले.
 विदेशी पाहुण्यांनीही अनुभवला विसर्जन सोहळा
बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी नागपूरकरांनी फुटाळ्यावर जोरदार गर्दी केली होती. नागपूरचा गणेश विसर्जन सोहळा बघण्यासाठी काही विदेशी पाहुणेही फुटाळ्यावर दिसून आले. गणेशाप्रती असलेली नागपूरकरांची श्रद्धा बघून, विदेशी महिलेनेही बाप्पाला पुष्प अर्पण करून नमस्कार केला.

Web Title: Bappa Tuza Virah Nako, Pudhchya Varshi Lavkar Ye H

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.