बाप्पा घेऊन आले पाऊस
By Admin | Updated: September 18, 2015 11:12 IST2015-09-18T02:44:57+5:302015-09-18T11:12:05+5:30
आराध्य विघ्नहर्त्याला स्थापन करण्याचा उत्साह दरवर्षीच दांडगा असतो. श्री गणेश म्हणजे साक्षात विघ्नहर्ता.

बाप्पा घेऊन आले पाऊस
पावसातही मिरवणुकीला उधाण : ढोल भिजले पण वाजले
नागपूर : आराध्य विघ्नहर्त्याला स्थापन करण्याचा उत्साह दरवर्षीच दांडगा असतो. श्री गणेश म्हणजे साक्षात विघ्नहर्ता. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना विघ्नहर्ता येतानाच थेट पाऊस घेऊन आला. बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गणेश स्थापनेच्या वेळेपर्यंत उसंतच घेतली नाही. यामुळे धरणी शांत झाली आणि बळीराजाही सुखावला. बळीराजाच्या चेहऱ्यावर बाप्पाने येतानाच आनंद निर्माण केला. पण मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस सकाळ झाल्यावरही कोसळत असल्याने गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता पसरली. पण दुपारी पावसाचा जोर कमी झाला आणि गणेशमूर्तींचा घरोघरी प्रवास सुरू झाला.
सकाळपासूनच पावसाने जराही उसंत न घेतल्याने गणेशभक्तांना घराबाहेर पडणे कठीण झाले. रेनकोट घालून बाहेर पडल्यावरही मातीची गणेशमूर्ती पावसात आणणे शक्य नव्हते. काहींनी सकाळी कारमधून श्रीं.ची मूर्ती घरी आणली. पण गणेश पूजनाचे साहित्य आणण्यासाठीही पावसामुळे समस्या निर्माण झाली होती. भद्रा काळातही गणेशाची स्थापना करण्यात काहीच गैर नव्हते कारण श्री साक्षात सारेच विघ्न दूर करणारा होता. पण अनेकांनी भद्रा काळ संपल्यावर दुपारी ११ नंतरच स्थापना करण्याचे ठरविले. दुपारी ११.४५च्या सुमारास पाऊस थांबला आणि भाविक चौकाचौकात पूजेचे साहित्य, फुले आणि नोंदणी केलेल्या गणेशमूर्ती घेण्यासाठी बाहेर पडल्याने शहरभरातील बाजारात अचानक गर्दी झाली. पाऊस असल्याने सक्करदरा चौक, गोकुळपेठ, इतवारी, महाल, मानेवाडा रोड, अयोध्यानगर, म्हाळगीनगर चौक, प्रतापनगर चौक, खामला येथील गणेश पूजनाची आणि गणेशमूर्तीची दुकाने ग्राहकांअभावी ओस पडली होती पण पावसाचा जोर कमी झाल्यावर सर्वच ठिकाणी गर्दी झाली.