बँका बंद एटीएम थंड
By Admin | Updated: November 15, 2016 02:29 IST2016-11-15T02:29:24+5:302016-11-15T02:29:24+5:30
नवीन चलनासाठी नागरिकांना सोमवारीही त्रास सहन करावा लागला. सोमवारी शासकीय सुटी असल्याने बँका

बँका बंद एटीएम थंड
नागपूर : नवीन चलनासाठी नागरिकांना सोमवारीही त्रास सहन करावा लागला. सोमवारी शासकीय सुटी असल्याने बँका बंद होत्या. त्यामुळे नागरिकांनी एटीएमपुढे रांगा लावल्या. पाच दिवसानंतरही शहरातील मोजकेच एटीएम सुरू होते. त्यामुळे नागरिकांना अधिक त्रास झाला.
५०० व १००० रुपयाच्या जुन्या नोटा रद्द करण्याची घोषणा होताच जुन्या नोटा बदलवून नवीन चलनासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन रविवारीसुद्धा बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. परंतु परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नाही. सोमवारी शासकीय सुटी असल्याने बँका बंद होत्या. त्यामुळे नागरिकांना जुन्या नोटा बदलवता आल्या नाही. परंतु हातात रुपये नसल्याने नागरिकांनी सोमवारी एटीएमसमोर रांगा लावल्या. शहरातील प्रत्येक भागात सुरू असलेल्या एटीएमसमोर नागरिकांच्या रांगा होत्या. सोमवारीसुद्धा मोजकेच एटीएम सुरू होते. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली. एटीएमच्या शोधात लोक फिरत होते. काही एटीएमवर संबंधित बँकेच्या कार्ड धारकांचेच कार्ड स्वीकारले जात होते. दुसऱ्या बँकेचे कार्ड असेल तर एटीएममधून नोटा निघत नव्हत्या. त्यामुळे बराच वेळ रांगेत लागल्यानंतरही एटीएममधून नोटा न निघाल्याने नागरिकांना वेगळाच मनस्ताप सहन कराव लागत होता जवळपास सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती होती. एटीएममध्ये रोख नाही, बँकेशी साधा संपर्क
गेल्या चार दिवसांप्रमाणे सोमवारीसुद्धा नागपुरातील अनेक लोक पैसे काढण्यासाठी सकाळीच बाहेर पडले. परंतु कालपर्यंत बँकेत रांगेत लागणाऱ्या लोकांनी आज एटीएमची वाट धरली. शहरातील मोजकेच एटीएम सुरू असल्याने नागरिकांना चांगलीच भटकंती करावी लागली. सकाळपासून सुरू झालेली ही शोधाशोध सायंकाळ आणि रात्रीपर्यंत सुरू होती.
बहुतांश एटीएम बंद
सोमवारी शहरातील बहुतांश ठिकाणचे एटीएम बंद होते. इतवारीसारख्या बाजारपेठेतील एटीएम बंद होते. जे एटीएम सुरू होते त्यातही तांत्रिक अडचणी येत होत्या. लोकांची गर्दी मोठी होती आणि एटीएममधील रक्कम दोन तासातच संपत होती. त्यामुळे बहुतांश लोकांना परत जावे लागत होते. एटीएममधील रोख संपल्याने रोख घेऊन वाहन येईल, या प्रतीक्षेतही अनेक जण एटीएमबाहेर बसले होते.
दुपारनंतर ठणठणाट
शासकीय सुटी असल्याने बँक आणि पोस्ट आॅफिस बंद राहणार असल्याची नगरिकांना आधीच कल्पना होती. त्यामुळे नागरिक एटीएममधून रक्कम काढण्यासाठी सकाळीच बाहेर पडले. सकाळी ८ वाजेपासूनच लोकांनी एटीएमसमोर रांगा लावल्या परंतु दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील बहुतांश एटीएमचे शटर अर्धे बंद होते. दुपारी १ वाजता एटीएममध्ये रोख भरण्यात आली. दुपारी ३ वाजेपर्यंत एकेक करीत एटीएम रिकामे झाले.