पोस्टाचे बँकिंग व्यवहार ठप्प
By Admin | Updated: June 26, 2014 00:57 IST2014-06-26T00:57:37+5:302014-06-26T00:57:37+5:30
गेल्या तीन दिवसांपासून पोस्टातील बँकिंग व्यवहार ठप्प पडले आहे. नेटवर्क फेल्युअर असल्याचे कारण पोस्टाच्या कार्यालयातून मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे मिळणे कठीण झाले आहे.

पोस्टाचे बँकिंग व्यवहार ठप्प
नेटवर्क फेल्युअर : ग्राहकांमध्ये संभ्रम
नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून पोस्टातील बँकिंग व्यवहार ठप्प पडले आहे. नेटवर्क फेल्युअर असल्याचे कारण पोस्टाच्या कार्यालयातून मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे मिळणे कठीण झाले आहे. सोमवारपासून ग्राहकांची पोस्टाच्या कार्यालयात पैशासाठी धावपळ सुरू आहे. ग्राहकांना अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने, ग्राहकांमध्ये संभ्रम वाढला असून, ते तणावात आहे.
ही परिस्थिती एकट्या नागपूरची नाही, संपूर्ण देशभरात पोस्टाची बँकिंग प्रणाली ठप्प पडली असल्याचे सांगण्यात येत आहे. पोस्टाचे सर्व्हर बंद पडल्यामुळे नागपुरातील जीपीओ, शंकरनगर येथील मुख्यालयाबरोबरच शहरातील इतर पोस्ट आॅफिसमध्ये काम बंद आहे. पोस्टाच्या बँकिंग व्यवहाराशी जुळलेले सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक आहे. पोस्टाच्या विविध योजनेंतर्गत त्यांना महिन्याला व्याजाच्या स्वरूपात एक ठराविक रक्कम पोस्टाच्या खात्यामार्फत मिळते. सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सूट यामुळे निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात पोस्टात गुंतवणूक करतात. सोमवारपासून अचानक त्यांना पैसे मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांनाही नेमकी माहिती नाही
कार्यालयातील एका अधिकाऱ्याला विचारले असता नाव न सांगण्याच्या अटीवर ते म्हणाले की, इन्फोसिस कंपनी पोस्टाची संगणकीय प्रणाली हाताळते. त्यांच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने या अडचणी येत आहे. एकाने सांगितले की, नवीन स्वॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण डाटा नवीन स्वॉफ्टवेअरमध्ये इंस्टॉल करावा लागत असल्याने काम ठप्प आहे. आणखी एक अधिकारी म्हणाले की, इंटरनेटच्या माध्यमातून देशभरातील संपूर्ण पोस्टाची कार्यालये एकमेकांशी जोडण्यात येणार आहे. टप्याटप्याने हे काम सुरू आहे. आतापर्यंत देशभरातील जवळपास ७०० पोस्ट आॅफिस इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. सध्या शहरातील पोस्ट आॅफिस या अंतर्गत जोडण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे पोस्टाचे व्यवहार ठप्प आहे. गुरुवारपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत होतील, असेही त्यांनी सांगितले.