बँकेला २९ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 03:12 IST2016-08-21T03:12:16+5:302016-08-21T03:12:16+5:30
कर्ज घेताना बँकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता परस्पर विकून एका कुख्यात आरोपीने बँक आॅफ इंडियाच्या कळमना शाखेला २९ लाखांचा गंडा घातला.

बँकेला २९ लाखांचा गंडा
नागपूर : कर्ज घेताना बँकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता परस्पर विकून एका कुख्यात आरोपीने बँक आॅफ इंडियाच्या कळमना शाखेला २९ लाखांचा गंडा घातला. काका ऊर्फ रणवीरसिंग गुरुचरणसिंग चंडोक (वय ४७) असे आरोपीचे नाव आहे. तो बाबा बुद्धाजीनगर, टेकानाका भागात राहतो.
त्याने बँक आॅफ इंडियाकडून काही दिवसांपूर्वी कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीची हमी म्हणून चंडोकने त्याचे कापसी खुर्द येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असलेली १५ आणि ७१ क्रमांकाची दोन दुकाने तारण ठेवली होती. चंडोकने बँकेच्या कर्जाची परतफेड तर केलीच नाही. उलट तारण ठेवलेल्या दुकानांची बनावट कागदपत्रे तयार करून ती परस्पर विकून टाकली. दरम्यान, कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेच्या वसुली पथकाने चौकशी केली असता ही धक्कादायक बाब उघड झाली.
चंडोकविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक रविशंकर आर. कुभारे (वय ५८, रा. विश्वास नगर) यांनी कळमना ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीची तक्रार नोंदवली. ठाणेदार सुनील बोंडे यांनी प्रकरणाची चौकशी करून घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर चंडोकला अटक करण्यात आली. रणवीरसिंग चंडोक हा काका चंडोक नावाने कुख्यात आहे. त्याच्याविरुद्ध जरीपटका, पाचपावली ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याच्याविरुद्ध पाचपावली ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एका पोलिसाने मध्यस्थाची भूमिका वठवली होती.
पीडित महिलेला धाक दाखवून तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दडपण आणले होते. या प्रकरणाची वरिष्ठांकडेही तक्रार झाली होती. मात्र, चंडोकविरुद्ध पाचपावली पोलिसांनी ठोस कारवाई केली नव्हती. चंडोकची टेकानाका परिसरात प्रचंड दहशत आहे. (प्रतिनिधी)