जीवनचक्राने बनराजला घडवला वनवास!
By Admin | Updated: October 27, 2016 02:23 IST2016-10-27T02:23:23+5:302016-10-27T02:23:23+5:30
अमरावती जिल्ह्यातील घाटलाडकीतून एक अल्पशिक्षित पण धाडसी तरुण कामाच्या शोधात थेट दिल्लीला पळाला.

जीवनचक्राने बनराजला घडवला वनवास!
लोकलच्या धडकेने अपंगत्व : पूनम ढिल्लोे, पद्मिनी कोल्हापुरेच्या ड्रायव्हरच्या हाती भिकेचे ताट
शफी पठाण नागपूर
अमरावती जिल्ह्यातील घाटलाडकीतून एक अल्पशिक्षित पण धाडसी तरुण कामाच्या शोधात थेट दिल्लीला पळाला. तिथून कुवैत नि पुढे दुबईला पोहोचला. पण, मायदेशाची ओढ काही स्वस्थ बसू देईना. अखेर मुंबईला परतण्याचा निर्णय झाला. या निर्णयालाही नशिबाची साथ मिळाली अन् तो थेट पद्मिनी कोल्हापुरेचा ड्रायव्हर झाला. नंतर पूनम ढिल्लोे, शिबाकडेही सेवा दिली. व्यवसायाने चालक असल्याने वेग त्याच्या रक्तात होता. पण, याच वेगाच्या नादात धडधडत येणाऱ्या लोकलच्या धडकेने त्याला अपंगत्व आले अन् एका वेगवान आयुुष्याला एका क्षणात इतके संथ करून टाकले की नाईलाजाने त्याला भिकेचे ताटच हाती घ्यावे लागले.
ही शोकांतिका आहे अखंडे आडनावाच्या पण खंडित आयुष्य जगणाऱ्या बनराजची. अमोल वाळके नावाच्या एका सहृदयी माणसाला तो नागपूरच्या गल्ल्यांमध्ये भीक मागताना सापडला अन् त्याला विश्वासात घेऊन बोलते केल्यावर त्याची ही व्यथा समोर आली. विश्वासू आणि मृदभाषी असल्याने पद्मिनी कोल्हापुरे, पूनम ढिल्लोे, शिबा यासारख्या नायिकांकडे त्याला वाहनचालकाचे काम मिळाले. हे काम करताना बनराजला त्याच्या मित्र-सहकाऱ्यांमध्ये एक वेगळेच ग्लॅमर लाभले होते. पण, दिल्लीत असताना पत्नी गमावल्यानंतर आयुष्य कधीच स्थिर नसते, हे त्याला कळून चुकले होते. म्हणून असेल कदाचित त्याने कधी या ग्लॅमरचा अवास्तव अभिमान बाळगला नाही की या मोठ्या नावांचा गैरफायदाही कधी उचलला नाही. आपले काम तेवढे प्रामाणिकपणे करीत राहिला. पण, प्रामाणिक असले तरी नशीब साथ देतेच असे नाही. एकदा डोंबिवलीत रेल्वे रूळ ओलांडताना अचानक लोकल धडधडत आली आणि बनराज सावरेल त्याआधीच त्याच्या दोन्ही पायातील त्राण नष्ट करून गेली़ डोळे उघडले तेव्हा तो सायन हॉस्पिटलला होता. जीव वाचला पण तो अपंग झाला. थोडा बरा झाल्यावर डॉक्टरांनी थोडी औषधे व एक व्हिलचेअर देऊन आपला पिच्छा सोडवला. या मायानगरीत आता निभाव लागणार नाही, हे कळल्यावर घाटलाडकीला परतायचे म्हणून बनराज रेल्वेत बसला अन् बडनेराला उतरताच न आल्याने थेट नागपुरात पोहोचला. जवळ होते ते सर्व संपल्यावर नाईलाजाने भिकेचे ताट हाती घेतले. अडीच महिन्यांपासून तो शहरात भीक मागत फिरत होता.
अमोल वाळकेंनी दिला मदतीचा हात
या सर्व प्रवासात अचानक कोसळलेल्या संकटानंतर दैव आणि देवाने त्याच्याकडे पाठ दाखवली. ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा होती त्यांनीही साथ सोडली. शेवटी नागपुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायी अमोल वाळके बनराजच्या मदतीला धावून आले. ते आपल्या कार्यालयाबाहेर उभे असताना अर्धपोटी बनराजने मोठ्या आशेने त्यांना नमस्कार केला. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले वाळके यांनी त्याची आस्थेने विचारपूस केली असता त्याची ही रामकहाणी समोर आली. त्यांनी लगेच त्याला आपल्या कार्यालयात नेले, पोेटभर जेवू घातले. तब्बल चार महिन्यांपासून बनराजने आंघोळ केली नव्हती. स्वत: वाळकेंनी त्याला आंघोळ घातली, डॉक्टरांकडे नेले. या व्यवहारी जगात अनपेक्षितपणे लाभलेल्या ममतेने आता कुठे बनराज थोडा सावरू लागला आहे. लोकमतशी बोलताना त्याने एक नवे आयुष्य दिल्याबद्दल डबडबलेल्या डोळ्यांनी वाळकेंप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
वंचितांसोबत साजरी करा दिवाळी
बनराजसारखे अनेक विवश, वंचित व्यक्ती आपल्याही सभोवताल जगत आहेत. आज अवघे शहर दिवाळीसाठी नवीन कपडे, मिठाया, भेटवस्तूच्या खरेदीत आनंद शोधत असताना या मंडळींना भाकरीच्या छोट्या तुकड्यासाठी दारोदारी हिंडावे लागत आहे. दिवाळी नक्कीच धडाक्यात साजरी करा; पण त्यातला मूठभर आनंंद या वंचितांच्या फाटक्या झोळीत टाका. मग बघा...लाखो रुपये मोजूनही मिळणार नाही असे समाधान तुमच्या चेहऱ्यावर असेल.
बनराज आता माझ्या कुटुंबाचाच एक सदस्य झाला आहे. त्याला आणखी उपचाराची गरज आहे. उपचाराचा संपूर्ण खर्च मी करणार आहे. तो पूर्णपणे बरा झाला की त्याला माझ्या संस्थेतच नोकरी देणार आहे. बनराजच्या पुढील आयुष्याची जबाबदारी आता माझी आहे.
अमोल वाळके