विदर्भातून प्रथमच केळींची निर्यात
By Admin | Updated: February 13, 2016 02:35 IST2016-02-13T02:35:50+5:302016-02-13T02:35:50+5:30
शेतमालाच्या उत्पादन क्षमता आणि दर्जा वाढवून निर्यातीकरिता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी उपलब्ध होईल, याकडे आता शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असून...

विदर्भातून प्रथमच केळींची निर्यात
नागपूर बनावे शेतीमालाच्या निर्यातीचे उत्तम केंद्र : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : शेतमालाच्या उत्पादन क्षमता आणि दर्जा वाढवून निर्यातीकरिता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी उपलब्ध होईल, याकडे आता शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असून भविष्यात नागपूर हे विदर्भातून शेतमालाच्या निर्यातीचे उत्तम केंद्र बनावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
अॅग्रोव्हिजन, महाआॅरेंज आणि मर्चेन्डाईज व्हेंचर्स यांनी विदर्भातून प्रथमच केळीचे कंटेनर शुकवारी इराणमध्ये निर्यात केले. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित शुभांरभा प्रसंगी ते बोलत होते. विदर्भातून प्रथमच केळी निर्यात होत असल्याचे समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांनी जागतिक बाजारपेठेकडे लक्ष केंद्रित करून लागवडीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
मर्चेन्डाईज व्हेंचर्सचे गिरीश जैन यांनी याकरिता पुढाकार घेतला असून, हे पहिले कंटेनर निर्यात करताना अतिशय आनंद होत असल्याचे सांगितले. अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारे प्रशिक्षण या माध्यमातून केलेला इस्रायल दौरा यातूनच ही प्रेरणा मिळाली, असेही ते म्हणाले. महाआॅरेंजचे श्रीधरराव ठाकरे यांनी संत्रा निर्यातीनंतर विदर्भातून केळी निर्यात करण्याचा हा प्रयत्न शेतकऱ्यांना भविष्याकरिता भरभराटीची चाहुल देणारा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अॅग्रोव्हिजनचे रवी बोरटकर यांनी यावेळी सांगितले की, नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात अॅग्रोव्हिजन सतत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहे. आता निर्यातीच्या क्षेत्रात शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा, प्रशिक्षित व्हावा, यासाठी भविष्यात त्या धर्तीवर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी महाआॅरेंजचे श्रीधर ठाकरे, राहुल ठाकरे, अॅग्रोव्हिजनचे सचिव रवी बोरटकर, एमव्हीचे संचालक गिरीश जैन, पूर्तीचे जनसंपर्क अधिकारी नितीन कुळकर्णी, मर्चेन्डाईज व्हेंचर्सचे सीईओ धर्मेंद्र शर्मा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)