फार्मसीतून रेमडेसिवीरच्या विक्रीला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:48+5:302021-04-07T04:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढ होत असून, डॉक्टर्स व रुग्णालयांद्वारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा अनियंत्रितपणे ...

फार्मसीतून रेमडेसिवीरच्या विक्रीला बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढ होत असून, डॉक्टर्स व रुग्णालयांद्वारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा अनियंत्रितपणे वापर केला जात आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाइकांना दुकानांमधून अव्वाच्या सव्वा किमती देऊन हे इंजेक्शन खरेदी करावे लागत आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी औषध दुकानांमध्ये रेमडेसिवीरच्या विक्रीला बंदी आणली आहे. केवळ कोविड रुग्णालय किंवा तेथील फार्मसीलाच याचा स्टॉकिस्टकडून पुरवठा होऊ शकणार आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भातील गैरप्रकार उचलून धरले होते हे विशेष.
ओपीडीमध्ये सीटी स्कॅनद्वारे केलेल्या तपासणीत सौम्य लक्षणात गणल्या जाणाऱ्या ५ ते ६ टक्के संसर्गाचे प्रमाण असलेल्या रुग्णांनाही रेमडेसिवीरचे इंजेक्शन लावले जाते. या प्रकारामुळे शहरात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असून, अशामुळे खरोखर गरज असलेल्या रुग्णांना इंजेक्शनसाठी संघर्ष करावा लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा निर्देश जारी केले. रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा तसेच पुरवठादारांवर देखरेख करता यावी यासाठी संबंधित निर्णय घेण्यात आला आहे. या पुरवठ्यावर देखरेख करणे व नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पुष्पहार बल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुरवठा व वाटप यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.