मतपत्रिकाच पारदर्शक व परवडणारी

By Admin | Updated: April 19, 2017 02:42 IST2017-04-19T02:42:52+5:302017-04-19T02:42:52+5:30

देशभरातील निवडणुकांमध्ये भाजपला एकतर्फी कौल मिळतो आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.

The ballot is transparent and affordable | मतपत्रिकाच पारदर्शक व परवडणारी

मतपत्रिकाच पारदर्शक व परवडणारी

राजकुमार तिरपुडे : मतदाराचा अविश्वास दूर करावा
नागपूर : देशभरातील निवडणुकांमध्ये भाजपला एकतर्फी कौल मिळतो आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. हा वाद बाजूला ठेवून निवडणूक खर्चाचा विचार केल्यास ईव्हीएमपेक्षा मतपत्रिकेचा वापर कमी खर्चात होतो. शिवाय यामुळे निवडणूक पारदर्शी होते. त्यामुळे मतपत्रिकेचा वापरच योग्य आहे, असे मत विदर्भ माझा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
तिरपुडे म्हणाले, नाागपूर महापालिकेत ईव्हीएमचा वापर करण्यात आला. ईव्हीएमचा वापर केल्यामुळे एका प्रभागात सुमारे ६४ लाख रुपये खर्च आला. हीच निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेतली असती तर फक्त ४० हजार रुपये खर्च आला असता. प्रत्येक बूथवर ईव्हीएमचा वापर करण्यात आला. एका ईव्हीएमची किंमत २० हजार रुपये आहे. एका बुथवर चार मशीनचा वापर झाला. त्यानुसार एका बूथवर ८० हजार रुपये खर्च झाला. एका प्रभागात सरासरी ८० बुथ होते. त्यानुसार एका प्रभागात फक्त मतदानावर ६४ लाख रुपये खर्च करण्यात आले. शिवाय एक ईव्हीएम जास्तीत जास्त १० वर्षे वापरता येते. त्यापुढे त्याचा वापर करणे सुरक्षित मानले जात नाही, असे कायदा मंत्र्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे एक ईव्हीएम तीन ते चार निवडणुकीतच कामी येऊ शकते. त्या तुलनेत मतपत्रिकेचा वापर केला तर कमी खर्चात काम होते.
मतपत्रिकेद्वारे मतदान केल्यामुळे आपण ज्याला मत दिले त्यालाच ते मिळाले असल्याची मतदाराला खात्री पटते. यावर शंका घेण्यास कुठलीही शक्यता उरत नाही. सध्या देशात ईव्हीएमवर अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.
अशात मतपत्रिकेचा वापर करून निवडणूक प्रक्रियेवरील मतदारांचा विश्वास वाढविण्याची तसेच लोकशाही अधिकळ बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला बाबा कोंबाडे, जिल्हाध्यक्ष नाना ठाकरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: The ballot is transparent and affordable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.