कळमेश्वर तालुक्यात काँग्रेस गटाचा बाेलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:02+5:302021-01-19T04:10:02+5:30
विजय नागपुरे लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : तालुक्यातील साेनपूर येथील निवडणूक अविराेध झाल्याने उर्वरित चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल साेमवारी ...

कळमेश्वर तालुक्यात काँग्रेस गटाचा बाेलबाला
विजय नागपुरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुक्यातील साेनपूर येथील निवडणूक अविराेध झाल्याने उर्वरित चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल साेमवारी (दि. १८) जाहीर करण्यात आले. यात पाचही ग्रामपंचायतींवर काँग्रेस समर्थित गटांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केल्याने तालुक्यात काँग्रेसचा बाेलबाला राहिला असून, भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित गटांना मतदारांनी धक्का दिला आहे.
कळमेश्वर तालुक्यात तिन्ही जिल्हा परिषद सर्कल आणि सहा पंचायत समिती सर्कल काँग्रेसच्या ताब्यात आहेत. सोनेगाव येथे नऊपैकी सात जागांवर काँग्रेस समर्थित गटाने विजय मिळविला असून, भाजप समर्थित गटाच्या झाेळीत दाेन जागा पडल्या आहेत. सर्वाधिक ११ जागा असलेल्या काेहळी (माेहळी) येथे काँग्रेस समर्थित गटाने सात जागांवर विजय संपादन केला असून, भाजप समर्थित गट व अपक्षांना प्रत्येकी दाेन जागांवर समाधान मानावे लागले. सावंगी (घोगली) येथे नऊ जागांपैकी काँग्रेस समर्थित तीन गटाने सावंगी येथून उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले हाेते. काँग्रेस समर्थित चौथ्या गटाने घोगली येथे तीन उमेदवार उभे केले होते. यापैकी सावंगी येथून संजय तभाने यांच्या गटाचे चार, गुंडेराव हेलोंडे गटाचे दाेन तर, घोगली येथून प्रज्वल तागडे गटाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. हे तिन्ही गट काँग्रेस समर्थित आहेत.
....
साेनपूर-आदासा अविराेध
साेनपूर (आदासा) वगळता इतर चार ग्रामपंचायतींच्या एकूण ३८ पैकी काँग्रेस समर्थित गटाचे २८ उमेदवार निवडून आले असून, आठ जागांवर भारतीय जनता पक्ष समर्थित गटाने तर, दाेन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय संपादन केला. दाेन्ही अपक्ष उमेदवार काेहळी (माेहळी) येथील आहेत. अविराेध झालेल्या साेनपूर (आदासा) ग्रामपंचायतीवर नऊ उमेदवार काँग्रेस समर्थित गटाचेच आहेत. ही ग्रामपंचायत सुरुवातीपासून काँग्रेस समर्थित गटाच्या ताब्यात आहेत.
...
भाजपच्या राजेश जीवताेडे यांना धक्का
भाजपचे राजेश जीवताेडे यांच्यामुळे सेलू (गुमथळा) येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. कारण, ते दाेन पंचवार्षिक जिल्हा परिषद सदस्य राहिले असून, सेलू हे त्यांचे तसेच शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख विनाेद जीवताेडे यांचे मूळ गाव हाेय. सेलू येथील सहा तर गुमथळा येथील तीन जागांमिळून ही ग्रामपंचायत तयार झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे विनाेद जीवताेडे यांनी भाजप समर्थित गटाला समर्थन दिले हाेते. मात्र, सेलू येथील सहापैकी एकमेव जागेवर भाजप समर्थित गटाला यश मिळविता आले असून, पाच जागा काँग्रेस समर्थित गटाकडे गेल्या आहेत. गुमथळा येथील तिन्ही जागा भाजप समर्थित गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित गटाचे पाच तर भाजप समर्थित गटाचे चार उमेदवार निवडून आले आहेत.
....
ईश्वर चिठ्ठी व अपक्ष
सावंगी (घोगली) येथे वाॅर्ड क्रमांक-२ मधून सर्वसाधारण गटातून अनिकेत निखाडे व प्रशांत शेटे यांना प्रत्येकी २१३ मते मिळाली. यात ईश्वर चिठ्ठीने प्रशांत शेटे यांना काैल दिल्याने त्यांना विजयी घाेषित करण्यात आले. कोहळी (मोहळी) येथील वाॅर्ड क्रमांक-३ मधून देवकांत वानखेडे व स्वाती पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. या दाेन्ही उमेदवारांनी काँग्रेस व भाजप समर्थित गटाच्या उमेदवारांना टक्कर देत भरघोस मतांनी विजय संपादन केला.