बजाज यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By Admin | Updated: October 6, 2015 03:42 IST2015-10-06T03:42:53+5:302015-10-06T03:42:53+5:30

भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधीची अपसंपदा जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष

Bajaj's anticipatory bail rejected | बजाज यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बजाज यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नागपूर : भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधीची अपसंपदा जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांनी जरीपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाज यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
महात्मा गांधी सेंटिनियल हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून दीपक बजाज हे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून मासिक ७६ हजार ७३३ रुपये पगार घेतात. त्यामुळे ते भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम २ (क) (१) प्रमाणे लोकसेवक आहेत. ते आपल्या पदाचा दुरुपयोग करून सिंधू एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून विविध स्वरूपाची शुल्क आकारणी करून स्वत:चा व कुटुंबाचा आर्थिक फायदा करून घेत होते. सर्व शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याकरिता मोठ्या प्रमाणावर देणगीच्या स्वरूपात लाच घेत होते. तसेच शासनाकडून मदतीच्या स्वरूपात विविध अनुदाने स्वीकारून त्याचा उपयोग स्वत:च्या कुटुंबाकरिता करीत होते.
बजाज यांनी गैरमार्गाने जमवलेली अपसंपदा त्यांचे जरीपटका के.सी. बजाज मार्गावरील महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूल परिसरातील साईकृपा या प्रिंसिपल बंगलोमध्ये ठेवलेली आहे, अशा गुप्त माहितीच्या आधारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजीव जैन यांनी न्यायालयाकडून रीतसर घरझडती वॉरंट प्राप्त करून आपल्या पथकासह २४ सप्टेंबर २०१५ रोजी धाड घातली होती. (प्रतिनिधी)


पावणेतीन कोटींची अपसंपदा
दीपक बजाज यांचे निवासस्थान, शाळा कार्यालय, सोसायटी कार्यालय आणि इतर परिसराच्या झडतीत १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख, २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किंमतीचे घरगुती सामान, अशी एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किंमतीची स्थावर व जंगम मालमत्ता आढळून आली. पथकाने २९ सप्टेंबर रोजी पुन्हा सिंधू एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय, सिंधू एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे कार्यालय तसेच कार्यालय परिसरातील प्रिटिंग प्रेसची पुरावे गोळा करण्याच्या हेतूने झडती घेतली असता पतसंस्थेच्या गुप्त लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली होती.
आढळला अब्जोवधीचा व्यवहार
दीपक बजाज यांची घरझडती घेण्यात आली असता त्यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या स्वत:च्या हस्ताक्षरात २६ चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यावर बजाज यांनी दुसऱ्या व्यक्तींना व्याजाने दिलेल्या रकमांचा उल्लेख आहे. ही रक्कम ३ अब्ज ९७ कोटी १६ लाख २७ हजार २९७ एवढी मोठी आहे. बेडरुममधूनच ९७ वस्तू खरेदी केल्याच्या पावत्या आढळून आल्या. त्यांची किंमत १० कोटी ५७ लाख ५१ हजार ६९ रुपये आहे. सर्व ११७ चिठ्ठ्यांची रक्कम ४ अब्ज ७ कोटी ७३ लाख ७८ हजार ३६६ एवढी मोठी आहे.

Web Title: Bajaj's anticipatory bail rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.