- जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड लाइनची संयुक्त कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बजाजनगर परिसरात जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड लाइनच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला. त्यांनतर अल्पवयीन मुलीला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार बालगृहात पाठविण्यात आले.
सोमवारी सकाळी चाइल्ड लाइनच्या पथकाला बजाज नगरात
एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह उमरेड येथील एका युवकाशी लावला जाणार असल्याची माहिती मिळाली.
ही माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी मुश्ताक पठाण यांना देण्यात आली. त्यांनतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन जाधव यांच्या निर्देशानुसार पोलिसांच्या मदतीने पथक घटनास्थळी पोहोचले. मुलीचा जन्म प्रमाणपत्र मागितल्यावर मुलीच्या नातेवाइकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. दरम्यान नगरसेविका लक्ष्मी यादव घटनास्थळी पोहोचल्या आणि नातेवाइकांना १८ वर्षाखालील मुलीचा विवाह बेकायदेशीर असल्याची समज दिली. तद्नंतर बाल विभागाच्या पथकाने मुलीच्या नातेवाइकांकडून लिखित आश्वासन घेतले. अल्पवयीन मुलीला बाल कल्याण समितीपुढे सादर केल्यानंतर समितीने मुलीला बालगृहात ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई बाल संरक्षण अधिकारी पठाण, साधना हटवार, अमरजा खेडीकर, एपीआय थोरात, चाइल्ड लाईनच्या पूजा कांबळे, स्नेहा सोनटक्के यांनी केली.