‘फंड’ चालवून फसवणाऱ्या महिलेस जामीन
By Admin | Updated: February 18, 2015 02:47 IST2015-02-18T02:47:28+5:302015-02-18T02:47:28+5:30
‘ कनक फंड’ या नावाने गोरखधंदा सुरू करून दामदुप्पटचे आमिष दाखवीत महिला गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करणाऱ्या एका महिला आरोपीला...

‘फंड’ चालवून फसवणाऱ्या महिलेस जामीन
नागपूर : ‘ कनक फंड’ या नावाने गोरखधंदा सुरू करून दामदुप्पटचे आमिष दाखवीत महिला गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करणाऱ्या एका महिला आरोपीला शनिवारी अवकाशकालीन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कु. आर. आर. चौधरी यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला.
कनक सुनीलकुमार मिश्रा, असे आरोपी महिलेचे नाव असून ती नारा ओमनगर येथील रहिवासी आहे. नारा येथील शालिनी मोरेश्वर धोटे या महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी कनक मिश्राविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ५०४ आणि ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली होती. आरोपी महिलेने २०१३-१४ मध्ये प्रत्येकी १० हजार रुपये महिना या प्रमाणे शलिनीकडून १ लाख २० हजार, चित्रलेखा पटलेकडून २ लाख ८००, भूमिका लिल्हारे आणि सुरेखा बैसारे यांच्याकडून प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये , असे एकूण ५ लाख ६० हजार ८०० रुपये घेऊन त्यांना त्यांचे पैसे परत न करता फसवणूक केली. शिवाय खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी दिली.
जरीपटका पोलिसांनी आरोपी महिलेचा दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता. मुदत संपल्याने शानिवारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावताच आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणातील फिर्यादी महिला शालिनी धोटे यांच्या वतीने अॅड. प्रसाद यांनी जामिनास विरोध केला. आरोपी महिलेने अनेक महिलांकडून फंड गोळा करून ५० लाखाहून अधिक रकमेने फसवले आहे. त्यामुळे तिला जामीन मंजूर करू नये, असे ते युक्तिवादात म्हणाले. बचाव पक्षाच्यावतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, गुंतवणूकदार महिलांपैकी काहींचे पती खासगी कंपनीत कामगार आहेत, कोणी प्लंबर तर कोणी पिग्मी एजंट आहेत. त्यामुळे त्यांनी १० हजार रुपये महिना आरोपी महिलेकडे जमा करणे अशक्य बाब आहे. याबाबत त्यांच्याकडे पुरावेही नाहीत.
न्यायालयाने बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपीस जामीन मंजूर केला. न्यायालयात आरोपीच्यावतीने अॅड. पराग उके आणि अॅड. पंकज राजवाडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)