कुख्यात आंबेकरचा जामीन अर्ज फेटाळला
By Admin | Updated: May 16, 2014 00:50 IST2014-05-16T00:50:59+5:302014-05-16T00:50:59+5:30
अंबाझरी पोलीस ठाण्यात पिस्तुलाच्या धाकावर बिल्डरकडून धनादेशाच्या स्वरूपात ६५ लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी कुख्यात खंडणीबहाद्दर संतोष शशिकांत आंबेकर

कुख्यात आंबेकरचा जामीन अर्ज फेटाळला
पिस्तुलाच्या धाकावर खंडणी वसुलीप्रकरण नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्यात पिस्तुलाच्या धाकावर बिल्डरकडून धनादेशाच्या स्वरूपात ६५ लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी कुख्यात खंडणीबहाद्दर संतोष शशिकांत आंबेकर याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. खामला भागातील आदिवासी सोसायटी शास्त्री ले-आऊट येथील रहिवासी बिल्डर जितेंद्र अयोध्याप्रसाद चव्हाण यांनी रविकांत खुशाल बोपचे यांच्याशी भागीदारी करून, २२ फेब्रुवारी २0१३ रोजी राहुल बाबूराव वासनिक याचा अंबाझरी ले-आऊटमधील ३ हजार चौरस फुटाचा भूखंड ६५ लाखांत विकत घेतला होता. या सौद्याच्या सहा महिन्यानंतर राहुल वासनिक याची पत्नी पूनम ही संजय फातोडे आणि गौतम भटकर यांना सोबत घेऊन चव्हाण यांच्या कार्यालयात गेली होती. तिने भूखंडाच्या विक्रीचे पैसे मागितले असता, चव्हाण यांनी तिला तिच्या पतीकडूनच कायदेशीर मार्गाने पैसे घेण्याचा सल्ला दिला होता. बिल्डरकडून आपणास रक्कम मिळत नसल्याचे पाहून, पूनमने आपल्या साथीदारांच्या ओळखीने कुख्यात संतोष आंबेकरची मदत घेतली होती. पुढे संतोषने चव्हाण यांना आपल्या इतवारी येथील कार्यालयात बोलावले होते. पूनमच्या मिळकतीचे ६५ लाख रुपये देऊन टाक, त्यानंतरच माझ्याकडून राहुल वासनिक याच्या घराच्या तळमजल्याची चावी घेऊन जाशील, नाही तर प्रॉपर्टी विसरून जा, अशी धमकीही संतोषने दिली होती. १४ डिसेंबर २0१३ रोजी राहुल वासनिक याने चव्हाण यांना तळमजल्याचा ताबा देऊन टाकला होता. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी चव्हाण यांना बोलावून याबाबतचा जाब विचारला होता. त्याच दिवशी आंबेकर हा आपले साथीदार युवराज माथनकर आणि आकाश बोरकर यांना सोबत घेऊन अंबाझरी पोलीस ठाण्यात गेला होता. या ठिकाणी आंबेकरने आपल्या कंबरेत खोचलेले पिस्तूल चव्हाण यांना दाखवून त्यांच्याकडून ६५ लाखांचे दोन धनादेश लिहून घेतले होते. त्यापैकी ३0 लाखांचा एक धनादेश पूनमच्या नावाचा होता, दुसरा ३५ लाखांचा धनादेश विना नावाचा होता. चव्हाण यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी १७ जानेवारी रोजी संतोष आंबेकर, संजय फातोडे, युवराज माथनकर, पूनम वासनिक, आकाश बोरकर, गौतम भटकर यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३४२, ३८६, ३८७, ३४ तसेच हत्यार कायद्याच्या कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, चव्हाण यांनी या दोन्ही चेकबाबत बँकेला कळवून ‘स्टॉप पेमेंट’ करण्यास सांगितले होते. त्यामुळे चिडून ८ जानेवारी २0१४ रोजी चार जणांनी चव्हाण यांच्या घरावर हल्ला केला होता. आल्टो आणि घराच्या खिडक्यांची तोडफोड केली होती. याबाबत राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे. २९ जानेवारी २0१४ रोजी गुन्हे शाखा पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात संतोष आंबेकर आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली होती. (प्रतिनिधी)