आंबेकरला जामीन
By Admin | Updated: July 5, 2014 02:10 IST2014-07-05T02:10:34+5:302014-07-05T02:10:34+5:30
न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. परवाणी यांच्या न्यायालयाने नागपुरी डॉन संतोष आंबेकर याला जामीन मंजूर केला.

आंबेकरला जामीन
नागपूर : न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. परवाणी यांच्या न्यायालयाने नागपुरी डॉन संतोष आंबेकर याला जामीन मंजूर केला.
उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशानुसार आंबेकर हा कारागृहाच्या बाहेर पडताच त्याला १ जुलै रोजी आर्थिक गुन्हे पथकाने अटक करून त्याचा चार दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता.
मूळ प्रकरण असे की, संतोष आंबेकरचा भाचा शैलेश ज्ञानेश्वर केदार, खुद्द आंबेकर आणि साथीदारांनी एका बलात्कारपीडित तरुणीचे वेडसरपणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि शपथपत्र तयार केले होते. या दस्तऐवजांचा आधार घेऊन शैलेश हा सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेण्याच्या प्रयत्नात असताना, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. परिणामी १० फेब्रुवारी २०१४ रोजी सदर पोलीस ठाण्यात शैलेश आणि साथीदारांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आंबेकरच्या पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपताच आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर करून, त्याच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली. बचाव पक्षाने पोलीस कोठडी रिमांडचा विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. लागलीच बचाव पक्षाने जामीन अर्ज दाखल करताच न्यायालयाने तो मंजूर करून आरोपीला सात हजाराच्या अनामत रकमेवर सोडण्याचा आदेश दिला. न्यायालयात आरोपीच्या वतीने अॅड. डी. एस. श्रीमाळी, अॅड. राम मासुरके यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)