अॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ बहुजनांचा एल्गार
By Admin | Updated: January 15, 2017 02:13 IST2017-01-15T02:13:46+5:302017-01-15T02:13:46+5:30
अॅट्रॉसिटी अॅक्ट अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था करण्यात यावी,

अॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ बहुजनांचा एल्गार
बहुजन क्रांती मोर्चा : दलित, ओबीसी, आदिवासी, मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजबांधवांचा सहभाग
नागपूर : अॅट्रॉसिटी अॅक्ट अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था करण्यात यावी, भटके विमुक्तांनाही अॅट्रॉसिटी अंतर्गत संरक्षण देण्यात यावे, आदी विविध मागण्यासांठी शनिवारी नागपुरात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बौद्ध, दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी आदी समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रेशीमबाग चौक येथून निघालेला हा मोर्चा अशोक चौक, बैद्यनाथ चौक, सीताबर्डी, व्हेरायटी चौकमार्गे संविधान चौक येथे पोहोचला. संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एका शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चा सुरू होण्यापूर्वी रेशीमबाग मैदान येथे जाहीर सभा पार पडली. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे अध्यक्षस्थानी होते. या सभेला भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मार्गदर्शन करीत राज्य सरकारवर चौफेर टीका केली. अॅट्रॉसिटी अॅक्ट शिथिल करण्याचे षड्यंत्र सरकार रचत आहे. परंतु या कायद्यातील एक ऊकार किंवा स्वल्पविराम सुद्धा कमी केला तर सोडणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मराठा व ओबीसी आणि दलित बांधवांमध्ये सरकार भांडण लावत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी भदंत सुरेई ससाई, रवी शेंडे, नारायण बागडे, अर्चना भोयर, श्रीधर साळवे, सुनील पेंदारे, प्रा. रमेश पिसे, मंगेश गेडाम, रेव्हरंड, गायकवाड, इमाम मसुद, मौलाना हफीज असरफ आदींनीही मार्गदर्शन केले.
मोर्चात भीमराव फुसे, देवेंद्र घरडे, अमोल वाकुडकर, वंदना बेंजामिन, स्मिता कांबळे, बबिता मेहर, यशवंत मेश्राम, आकाश दुपारे, प्रवीण कांबळे, नागोराव धोंडे, अविनाश निमकर, डॉ. प्रफुल्ल मेश्राम, सुषमा भड, अरुण गाडे आदींसह जवळपास ४६८ संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)
बहुजन क्रांती मोर्चा जनआंदोलनाचे रूप घेणार
बहुजन क्रांती मोर्चा हा विविध समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेले एक व्यासपीठ असून त्याला जनआंदोलनाचे रूप देण्यात येणार आहे, अशी माहिती बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सध्या राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. येत्या २१ तारखेला मुंबईत याचा समारोप होईल. त्यानंतर राज्यातील प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जातील. यानंतर देशातील ३१ राज्यांमध्ये आणि जवळपास ५०० जिल्ह्यांमध्ये मोर्चा काढण्यात येईल. या माध्यमातून जवळपास सहा लाख गावांपर्यंत पाहोचण्याचा आमचा संकल्प आहे. प्रत्येक गावात या मोर्चाची एक शाखा तयार केली जाईल. जोपर्यंत आमच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असेही वामन मेश्राम यांनी स्पष्ट केले.