महागाईचा निघणार बडगा - आज मारबत मिरवणूक :
By Admin | Updated: September 2, 2016 02:44 IST2016-09-02T02:44:20+5:302016-09-02T02:44:20+5:30
विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी मारबत आणि बडग्याची मिरवणूक उद्या शुक्रवारी सकाळी निघणार आहे.

महागाईचा निघणार बडगा - आज मारबत मिरवणूक :
नागपूरची परंपरा झळकणार
नागपूर : विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी मारबत आणि बडग्याची मिरवणूक उद्या शुक्रवारी सकाळी निघणार आहे. या मिरवणुकीत काळी व पिवळी मारबतसोबतच मासुरकर चौक, लालगंज, प्रेमनगर, फुकटनगर, पिवळीनदी, इतवारी, लालगंज, खैरीपुरा, नंदनवन झोपडपड्डी भागात तयार करण्यात आलेले बडगेही निघणार आहेत. दीडशे वर्षांपासून सुरू असलेली ही मारबतची परंपरा पोळ्याचे खास आकर्षण असते. मारबत पाहण्यासाठी मध्य प्रदेश व मराठवाड्यासह वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक शहरात येत असतात. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या अन्यायाला विरोध करण्याच्या उद्देशाने मारबत शहरात फिरत असे. आता विविध सामाजिक अपप्रवृत्तींच्या विरोध करण्याचे मारबत हे एक प्रतीक झाले आहे. मारबत आणि बडग्याच्या मिरवणुकीच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर यथार्थ टीका केली जाते. यंदाही ही परंपरा कायम असणार आहे. उद्या काळी मारबत व पिवळी मारबतची नेहरू पुतळा चौक येथे भेट होईल. हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी नागपूरकर येथे गर्दी करणार आहेत.(प्रतिनिधी)