बडेगाव प्रा. आ. केंद्र ‘हिटलिस्ट’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:06+5:302021-04-07T04:09:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बडेगाव : सावनेर तालुक्यातील बडेगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. ...

बडेगाव प्रा. आ. केंद्र ‘हिटलिस्ट’वर
लाेकमत न्यूज नेटवर्क
बडेगाव : सावनेर तालुक्यातील बडेगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. या आराेग्य केंद्रांतर्गत साेमवार (दि. ५)पर्यंत एकूण ७२ रुग्णांची नाेंद करण्यात आली हाेती. त्यातील ४४ रुग्ण हे एकट्या टेंभूरडाेह गावातील आहेत. शिवाय, तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे प्राथमिक आराेग्य केंद्र आला ‘हिटलिस्ट’वर आले आहे.
या आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या टेंभूरडाेह येथील ४४ रुग्णांसाेबतच बडेगाव उपकेंद्रात ३१, कोच्छी येथे २५, सिरोंजी येथे २८,कोथुळणा येथे १७ आणि नागलवाडी येथे चार रुग्ण आहेत. या भागातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लाेकमतमध्ये २७ मार्च राेजी ‘बडेगाव परिसरात काेराेनाचा उद्रेक’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले हाेते. त्या वृत्ताची दखल घेत खंडविकास अधिकारी अनिल नागणे, नायब तहसीलदार सतीश मासाळ, पंचायत समिती सदस्य भावना चिखले यांनी बडेगाव, टेंभूरडोह व खुबाळा गावांची पाहणीही केली हाेती. त्यांनी कर्मचाऱ्यांना काही सूचनाही केल्या हाेत्या.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लस हा प्रभावी उपाय असला तरी बडेगाव परिसरातील गावांमध्ये लसीकरणाचा वेगही कमी आहे. याला साेशल मीडियावर फिरत असलेले चुकीचे संदेश, प्रशासनाची आपल्याप्रति काहीच जबाबदारी नाही काय, असे उपदेश, आपण स्वत:ची जबाबदारी विसरून शासन व प्रशासनाला टार्गेट करणे, कामावर जाता येत नाही म्हणून लस न घेणे, नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यात आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वेळेअभावी येत असलेले अपयश, लस घेण्यापूर्वी उच्च रक्तदाब, रक्तशर्करा व अन्य गंभीर आजाराची डाॅक्टरांना माहिती न देता मृत्यूची भीती बाळगणे, आराेग्य व पंचायत विभागाचे कर्मचारी व आशासेविकांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता अफवांवर विश्वास ठेवणे यासह अन्य बाबी कारणीभूत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे.
एकीकडे आराेग्य विभागाचे कर्मचारी काेराेना टेस्ट व लसीकरणात गुंतले असून, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. कामाच्या व्यापामुळे त्यांच्याकडे प्रत्येकाच्या शंकांचे निरसन करण्यास पुरेसा वेळ नसताे. दुसरीकडे काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण घराबाहेर फिरत असताना ग्रामपंचायत प्रशासन त्यांना आवर घालण्यात त्यांनी घराबाहेर विलगीकरणाची साेय करण्यात कमी पडत आहे. या रुग्णांकडे लक्ष देण्याची जबाबदारी अंगणवाडी व आशासेविकांवर साेपविण्यात आली आहे. रुग्ण त्यांना जुमानत नसल्याने नागरिकांचा हा हलगर्जीपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडत असल्याची माहिती सुज्ञ नागरिकांनी दिली.
........
लस घेण्यापूर्वी ही काळजी घ्या
ग्रामीण भागात काेराेना लस घेण्याबाबत माेठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाल्याने बडेगाव परिसरातील बहुतांश नागरिक लस घेण्यास धजावत नाहीत. काेणतीही लस मानवी आराेग्याला घातक नसून ती राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास पूरक ठरत असल्याने तसेच ती घेण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. एखादी व्यक्ती काेराेना पाॅझिटिव्ह आली असेल तर त्या व्यक्तीने निगेटिव्ह रिपाेर्ट आल्यानंतर किमान दाेन महिने ही लस घेऊ नये, लस घेण्यापूूर्वी बीपी व शुगर नाॅर्मल असणे आवश्यक असल्याने या आधी तपासण्या करून घ्याव्या, गंभीर आजाराचे रुग्ण आणि ॲलर्जिक रुग्णांनी ही लस डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी. सर्दी, ताप, खाेकला असल्यास तत्काळ लस घेऊ नये. काेणताही आजार असल्यास ताे डाॅक्टरांना मनमाेकळेपणाने सांगावा, अशा सूचनाही डाॅक्टरांनी केल्या आहेत.