बाबासाहेबांची उंची हिमालयाहून अधिक
By Admin | Updated: September 4, 2014 00:56 IST2014-09-04T00:56:04+5:302014-09-04T00:56:04+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उंची हिमालयाहून अधिक व विचारांची खोली हिंद महासागरापेक्षा जास्त होती, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.

बाबासाहेबांची उंची हिमालयाहून अधिक
न्यायमूर्ती भूषण गवई : ‘परिसस्पर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उंची हिमालयाहून अधिक व विचारांची खोली हिंद महासागरापेक्षा जास्त होती, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी प्रबंधक दिवंगत भालचंद्र वराळे यांनी लिहिलेल्या ‘परिसस्पर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा’ पुस्तकाचे आज, बुधवारी न्या. गवई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक प्रा. महेश एलकुंचवार, पुस्तकातील प्रस्तावनेचे लेखक दत्ता भगत, एल. बी. रायमाने, नांदेड येथील संगत प्रकाशनचे जयप्रकाश सूरनार प्रमुख अतिथी होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाही.
बाबासाहेबांनी जवळपास सर्वच विषयांना हात घातलेला आहे. त्यांनी अस्पृश्यता व अत्याचार संपविण्यासाठी जीवनभर कार्य केले. राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांचे अमूल्य योगदान आहे. असामान्य व्यक्तिमत्त्व असतानाही त्यांचे वागणे मात्र सामान्यांसारखेच होते, असे न्या. गवई यांनी सांगितले.
पुस्तकावर समीक्षणात्मक बोलण्याचे टाळून एलकुंचवार म्हणाले, हे पुस्तक केवळ आठवणी नसून अवदान आहे. अवदान ही परंपरा मराठी वाङ्मयात जास्त वापरल्या गेलेली नाही. बरेच बुद्धकालीन वाङ्मय नाहिसे झालेले आहे. आपण एवढे करंटे आहोत की प्राचीन परंपरा नष्ट होऊ देतो. बुद्धकालीन वाङ्मय अभ्यासक्रमात नाही हा चिंतेचा विषय आहे. प्राचीन परंपरा विसरणारा समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही. आपले ज्ञान विक्रेय आहे. मूलभूत ज्ञान व कलेच्या ठिकाणी जाती आपोआप गळून पडतात. विपषणा हा आत्मशुद्धीचा भाग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वाद संपत्तीसाठी नव्हता. माणसांना सबुद्ध करण्यासंदर्भात त्यांच्यात मतभेद होते, याकडे भगत यांनी लक्ष वेधले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी प्रास्ताविक केले. सूरनार, रायमाने, भगत व मनोहर झिलटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विधी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.(प्रतिनिधी)