बाबासाहेबांना अभिप्रेत समाजनिर्मिती आवश्यक

By Admin | Updated: February 9, 2015 00:58 IST2015-02-09T00:58:02+5:302015-02-09T00:58:02+5:30

आज देशामध्ये वाढत्या लोकसंख्येत माणसांची कोणतीही कमी नाही. परंतु माणुसकीचा दुष्काळ पडतो आहे. त्यामुळे समाजासमाजात, जाती-धर्मात, पंथात माणूस विभागाला जात आहे,

Babasaheb wants to generate a society | बाबासाहेबांना अभिप्रेत समाजनिर्मिती आवश्यक

बाबासाहेबांना अभिप्रेत समाजनिर्मिती आवश्यक

‘बाबांचे शिलेदार’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन
नागपूर : आज देशामध्ये वाढत्या लोकसंख्येत माणसांची कोणतीही कमी नाही. परंतु माणुसकीचा दुष्काळ पडतो आहे. त्यामुळे समाजासमाजात, जाती-धर्मात, पंथात माणूस विभागाला जात आहे, अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाजनिर्मिती आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.
आंबेडकरी चळवळीतील सहकारी सत्कार मंचच्यावतीने आयोजित अ‍ॅड. हंसराज भांगे लिखित ‘बाबांचे शिलेदार’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते रामगोपाल माहेश्वरी सभागृहात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभात दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, आ. डॉ. मिलिंद माने, माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड, डॉ. पूरण मेश्राम, समता सैनिक दलाचे प्रमुख हरीश चहांदे, बाबा हातेकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष चंद्रबोधी पाटील प्रमुख अतिथी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सर्व दीनदुबळे, शोषितांची चळवळ आहे.
या चळवळीत ज्यांनी आपले अमूल्य योगदान दिले, बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून चळवळीत कामे केले, अशा बाबांच्या शिलेदारांना समाजापुढे आणण्याचे महत्त्वपूर्ण काम हंसराज भांगे यांनी केले आहे. हा ग्रंथ अतिशय अमूल्य असून तो प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, तेव्हा समाजकल्याण विभागा अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व वसतिगृहांमध्ये हा ग्रंथ पोहाचवण्यात येईल, असे आश्वासन सुद्धा सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी यावेळी दिले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. भाऊ लोखंडे यांनी सध्याचा काळ अतिशय कठीण असल्याची जाणीव करून दिली. या कठीण काळात बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणखी एकजुटीने राहण्याची गरज आहे. बाबासाहेबांना आपल्या अनुयायांपासून मोठ्या अपेक्षा होत्या. तेव्हा एकजुटीने ही चळवळ गतिमान ठेवण्याचा प्रयत्न करू या, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रंथाचे लेखक अ‍ॅड. हंसराज भांगे यांनी यावेळी प्रस्ताविक व आपले मनोगत व्यक्त केले. भंते नाग दीपांकर यांनी बुद्धवंदना सादर केली. ललित खोब्रागडे यांनी संचालन केले. रामभाऊ आंबुलकर यांनी आभार मानले. गजानन आवळे, डी.एम. बेलेकर, सुधीर मेश्राम, भय्या शेलारे, सुधीर भगत, भीमराव गणवीर, नरेश मेश्राम, डी.एम. बेलेकर आदी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)

Web Title: Babasaheb wants to generate a society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.