बाबासाहेब आंबेडकर छोट्या राज्यांचे पुरस्कर्ते
By Admin | Updated: December 25, 2016 03:00 IST2016-12-25T03:00:38+5:302016-12-25T03:00:38+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच छोट्या राज्याचे पुरस्कर्ते राहिले आहेत. राज्यकारभार आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने छोटी राज्ये असावीत,

बाबासाहेब आंबेडकर छोट्या राज्यांचे पुरस्कर्ते
श्रीनिवास खांदेवाले : दीक्षाभूमी येथे व्याख्यानमाला
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच छोट्या राज्याचे पुरस्कर्ते राहिले आहेत. राज्यकारभार आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने छोटी राज्ये असावीत, असे त्यांचे मत होते. ज्यावेळी एका भाषेचे एक राज्य ही संकल्पना मांडली जात होती त्यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या महाराष्ट्राचे एक नव्हे तर चार राज्ये करावीत, असे सांगितले होते. यासाठी त्यांनी दिलेले तर्क हे आजही लागू होतात, असे प्रतिपादन रुईकर इन्स्टिट्यूट आॅफ लेबर अॅण्ड सोशिओ कल्चरल स्टडीजचे संचालक अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवनिमित्त दीक्षाभूमी येथे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. हरिभाऊ केदार होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, प्राचार्य पी.सी. पवार, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे प्रामुख्याने उपस्थित होते.
‘विदर्भाविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका’ या विषयावर बोलताना श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, बाबासाहेबांचा प्रत्येक विचार हा नैतिकता व मानवतेवर अवलंबून असल्याचे दिसून येते. त्यांचे विचार वाचून आपण उन्नत होतो. त्यांचे तर्क आजही लागू पडतात. राज्याच्या पुनर्रचनेबाबतही तेच दिसून येते. नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी होती. २२ जिल्हे त्यात होते.
यापैकी १४ जिल्हे हे हिंदी भाषिक आणि ८ जिल्हे हे मराठी भाषिक होते. मराठी भाषेचे वेगळे विदर्भ राज्य व्हावे, अशी विदर्भ राज्यातील नागरिकांची मागणी होती. परंतु ती मागे पडली आणि विदर्भाला महाराष्ट्रात जोडण्यात आले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे एक नव्हे तर चार राज्ये व्हावीत, अशी भूमिका मांडली होती. त्यात विदर्भाचे पूर्व महाराष्ट्र असे राज्य करण्यात यावे, अशी भूमिका मांडली होती. नागपूर कराराच्या वेळीसुद्धा त्यांनी या कराराला पश्चिम महाराष्ट्रातील नेते काडीचीही किंमत देणारी नाही, असे डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले होते. आज ती बाब खरी ठरली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत डॉ. आंबेडकरांचे विचार आज सर्वच राजकारण्यांनी बाद केले असल्याचेही खांदेवाले यांनी सांगितले. विदर्भ हा स्वतंत्र झाला तर तो निश्चितच सक्षम राज्य होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विजय चिकाटे यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. शैलेश बहादुरे यांनी संचालन केले तर प्रा. करपे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
सामाजिक समतेसाठी बाबासाहेब आयुष्यभर झटले
हरिभाऊ केदार यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांचा विकास घडून येण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर झटले. वेगळ्या विदर्भाची संकल्पना त्यांनी पूर्वीच मांडलेली होती. याकरिता डॉ. आंबेडकरांचे मूलगामी विचार महत्त्वाचे ठरलेले आहे. महाराष्ट्र व विदर्भाबाबत बोलताना ते म्हणाले, त्यांनी दोन भाऊ एकत्र राहू शकत नसतील तर मित्र म्हणून तर राहू शकतात. एकट्या पुण्यात जेवढे कारखाने आहेत, तितके संपूर्ण विदर्भातही नाहीत, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.