आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियेच्या परवानगीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST2021-02-05T04:45:12+5:302021-02-05T04:45:12+5:30
नागपूर : केंद्रीय भारतीय वैद्यक परिषदेने (सीसीआयएम) मूत्ररोग, पोट आणि आतड्यांच्या, दंतरोग, नेत्ररोगासह ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ आणि ...

आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियेच्या परवानगीला विरोध
नागपूर : केंद्रीय भारतीय वैद्यक परिषदेने (सीसीआयएम) मूत्ररोग, पोट आणि आतड्यांच्या, दंतरोग, नेत्ररोगासह ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ पदव्युत्तरांना स्वतंत्रपणे करण्याची परवानगी दिली आहे. या विरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) नेतृत्वात ‘ज्युनिअर डॉक्टर नेटवर्क’ने दोन दिवसांपासून आंदोलन हाती घेतले. यात मेडिकलचे २५०वर विद्यार्थी, इन्टर्न, निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.
‘सीसीआयएम’च्या अधिसूचनेविरुद्ध ‘आयएमए’ने ८ डिसेंबर रोजी नागपुरात चौकाचौकात शांततामय निदर्शने केली. तर ११ डिसेंबर रोजी एकदिवसीय संपही केला. ही ‘मिश्रपॅथी’ किती धोकादायक ठरू शकते याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली. तर, आयुर्वेद, नॅचरोपॅथी डॉक्टरांची नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) संपाच्या दिवशी नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांना परवानगी देण्याच्या या विषयामुळे दोन ‘पॅथी’ समोरासमोर आल्या आहेत. हे प्रकरण शांत होत असताना १ फेब्रुवारीपासून ‘आयएमए’च्या ‘ज्युनिअर डॉक्टर नेटवर्क’ने संयोजक डॉ. संजय बसल यांच्या पुढाकारात ‘रिले उपोषण’ सुरू करण्यात आले. ‘आयएमए’च्या परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात मेडिकलचे २५०वर विद्यार्थी व डॉक्टर सहभागी झाले आहेत. मंगळवारी त्यांनी जोरदार निदर्शने करीत आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया परवानगीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. या आंदोलनात डॉ. बन्सल यांच्यासह डॉ. रोहित केंडे, डॉ. सौरभ मेश्राम, डॉ. श्रीनाथ फुले, डॉ. आदित्या गोयल, डॉ. पंकज पटले, डॉ. हरीश पावडे आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.