लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने अयोध्येतील राममंदिर प्रकरणाच्या निकालानंतर नागपूरकडे देशाचे लक्ष लागले होते. नागपूरने सामाजिक सौहार्दाची परंपरा कायम राखली व निकालानंतर शहरात शांतता कायम राहिली. सर्वधर्मीय नागरिकांनी सामाजिक सलोखा पाळला व संयम राखला. नागपूर शहराच्या प्रतिमेला कसलाही धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी नागरिकांनी घेतली व विशेष म्हणजे एकमेकांना तसे आवाहनदेखील केले. शहरात जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. रात्रीपासूनच शहरात जागोजागी पोलीस दिसून येत होते. निकाल लागल्यानंतर सर्व जातीपंथाच्या लोकांनी त्याचे स्वागत केले.सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सर्वच पंथ-धर्मातील लोकांनी त्याचे स्वागत केले. हा निर्णय सर्वांना एकत्र आणणारा ठरला असा नागपूरकरांचा सूर होता. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनीदेखील त्याचे स्वागत केले. प्रकरणाची तीव्रता व गंभीरता लक्षात घेता सर्वांनीच अनावश्यक जल्लोष टाळला. काही ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आले, मात्र नागरिकांनी कुठेही संयम ढळू दिला नाही. विविध प्रार्थनास्थळांमध्ये नियमितपणे धार्मिक विधी पार पडले. सर्वच समुदायातील धर्मगुरुंनी शांततेचे आवाहन केले होते व नागपूरकरांनी त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील शहरातील एकोपा कायम राहील यादृष्टीने नियोजन केले. मुस्लिम बांधवांकडूनदेखील तसेच आवाहन करण्यात येत होते. एकाप्रकारे शहरवासीयांनी राष्ट्रीय एकात्मतेचेच दर्शन घडविले.नागपुरात शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनदेखील करण्यात आले होते. दिवसभर शहरात जागोजागी पोलीस होते व कुठेही तणाव जाणवला नाही. पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचेदेखील नागरिकांनी कौतुक केले.‘सोशल मीडिया’वर सामाजिक भावसाधारणत: ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून अनेकदा अफवांचा प्रसार होतो. मात्र नागपूरकरांनी या ‘फ्रंट’वरदेखील ‘स्पिरीट’ दाखवून दिले. शुक्रवारी रात्रीपासूनच सर्वांनी ‘सोशल मीडिया’वर जपून ‘पोस्ट’ करावे अशा आवाहनांच्या ‘पोस्ट’ फिरत होत्या. सकाळी सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतरदेखील संतुलित ‘पोस्ट’च फिरत होत्या. ‘व्हॉट्सअॅप’वर तर बऱ्याच ‘ग्रुप’वर ‘मॅसेज’ टाकण्याचे अधिकार केवळ ‘अॅडमिन’कडेच होते. ‘स्टेटस’, ‘डीपी’, ‘टाईमलाईन’वर ‘फोटो’ व ‘कमेन्ट्स’ टाकताना संयम दाखविण्यात आला. अनेकांचे शांतता राखण्याचे आवाहन करणारे ‘व्हिडीओ’देखील ‘व्हायरल’ होत होते.
Ayodhya Verdict : उपराजधानीने जपली सामाजिक सौहार्दाची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 23:16 IST
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने अयोध्येतील राममंदिर प्रकरणाच्या निकालानंतर नागपूरकडे देशाचे लक्ष लागले होते. नागपूरने सामाजिक सौहार्दाची परंपरा कायम राखली व निकालानंतर शहरात शांतता कायम राहिली.
Ayodhya Verdict : उपराजधानीने जपली सामाजिक सौहार्दाची परंपरा
ठळक मुद्देशहरवासीयांनी राखली शांतता व संयम : सलोखा पाळला