जनमंच - विघ्नहर्ताची प्रस्तुती : ‘और कारवाँ बनता गया ’नागपूर : बाहेर नुकतीच पावसाची हल्की सर येऊ न गेलेली...मृदगंधाने अवघे वातावरण भारावलेले...श्रोत्यांचे सारे लक्ष निविदिकेकडे...अन् पुढच्याच क्षणी विघ्नहर्त्याला साकडे घालत गायिका मंचावर आली आणि देशपांडे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढे तब्बल अडीच तास भारतीय चित्रपट सृष्टीच्या १०० वर्षांचा सोनेरी प्रवास प्रत्येक गीतातून उलगडत गेला. निमित्त होते जनमंच व विघ्नहर्ता संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘और कारवाँ बनता गया’ या संगीतमय मैफिलीचे. रविवारी देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाने श्रोते अगदी भावविभोर झाले होते. प्रेमगीत, विरहगीत, शास्त्रीय संगीत आणि कव्वालीने हिंदी चित्रपटाचा प्रत्येक रंग या कार्यक्रमात गायकांनी अप्रतिमरीत्या सादर केला. या कार्यक्रमातील गाण्यांची निवड आणि कलावंतांचे सादरीकरण एवढे दमदार होते की, श्रोत्यांमधून ‘वन्समोअरची’ मागणी येत होती. ज्येष्ठ गायिका सुरभी ढोमणे यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर गायक अरविंद पाटील यांनी ‘मैने तेरे लिये ही...सात रंग के...’, श्रीनिधी घटाटे हिने ‘निगाहे मिलाने को जी चाहता है...’ सागर मधुमटके याने ‘मै हूॅँ झुम झुम झुम...’ आणि मयंक लखोटिया याने ‘तुम जो मिल गये हो....’ गीत सादर केले. यानंतर सागरने ‘जिंदगी एक सफर है सुहाना...’, सुरभी यांनी ‘थाडे रहियो चलते चलते..’, ‘होठो मे ऐंसी बात...’, ‘देखा एक ख्वाब...’, पाटील यांनी ‘सावन का महिना...’, ‘मै पल दो पल का शायर...’, ‘छोडो कल की बाते...’ ‘दुनिया से जाने वाले..’, ‘जीना यहाँ मरना यहाँ..’ आणि मयंकने ‘हर घडी बदल रही..’ ‘टीक टीक वाजते...’, ‘झुकी झुकी...’, ‘हम तेरे बिन...’ व ‘मेरा रंग दे बसंती चोला..’ अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली.दरम्यान सुखकर्ताचे अध्यक्ष प्रकाश इटनकर, प्रमोद पांडे व संजय भरडे यांनी गायक व वाद्यवृंदांना पुष्पगुच्छ देऊ न त्यांचे स्वागत केले. गायक कलाकारांना तेवढ्याच ताकदीने वादकवृंद सचिन ढोमणे, महेंद्र ढोले, पवन मानवटकर, रिंकू निखारे, प्रसन्न वानखेडे, पंकज यादव, अमर शेंडे, नंदू गव्हाणे व विक्रम जोशी यांनी साथ दिली. मंच सजावट राजेश अमीन यांनी केली होती. निवेदन श्वेता शेलगांवकर यांनी केले.(प्रतिनिधी)
अविट गीतांचा अप्रतिम ‘कारवाँ’
By admin | Updated: August 18, 2014 00:38 IST