सोशल मीडियावर अफवा टाळा, सामाजिक सौहार्द जपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 07:00 IST2021-11-17T07:00:00+5:302021-11-17T07:00:11+5:30
Nagpur News सोशल मीडियावर अफवा टाळण्यात याव्या, असे आवाहन ‘सोशल मीडिया’ तज्ज्ञ अजित पारसे यांनी केले आहे.

सोशल मीडियावर अफवा टाळा, सामाजिक सौहार्द जपा
नागपूर : राज्यातील काही शहरांमध्ये हिंसाचार झाल्यानंतर त्याचे मूळ कारण सोशल मीडियावरील अफवा असल्याचे दावे यंत्रणांकडून करण्यात येत आहेत. ‘सोशल मीडिया’वरील अफवांवर तसेच ‘फेक न्यूज’वर सुरक्षायंत्रणांकडून बारीक नजर ठेवण्यात येत असून नागरिकांनीदेखील अशा घटनांना बळी पडण्याची आवश्यकता नाही. अजाणतेपणाने केलेली एखादी फॉरवर्डेड पोस्ट संबंधित व्यक्तीसोबतच समाजालादेखील नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे सोशल मीडियावर अफवा टाळण्यात याव्या, असे आवाहन ‘सोशल मीडिया’ तज्ज्ञ अजित पारसे यांनी केले आहे.
अमरावतीत हिंसेच्या घटनेनंतर काही दिवस इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. नागपुरातदेखील जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ‘सोशल मीडिया’वर पसरवणाऱ्या अफवांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. परंतु काही ‘प्लॅटफॉर्म’वरील अशा घटनांवर वचक ठेवणे कठीण आहे. ‘सोशल मीडिया’वर मस्करी म्हणून अफवा पसरवणारे मॅसेज, व्हिडिओ आणि फोटो फॉरवर्ड हिंसाचारालादेखील खतपाणी घालणारे ठरू शकतात. त्यामुळे नागरिकांनीच विशेष खबरदारी घेऊन सामाजिक सौहार्द जपण्यात मौलिक भूमिका पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.
गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी
विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे ‘वेबपोर्टल्स’ असून त्यावर नियमितपणे बातम्या ‘अपडेट’ होतात. परंतु अनेकदा ही वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांचे नावाखाली खोटे वृत्त तयार केले जाते व ते ‘सोशल मीडिया’वर पसरविले जाते. एखाद्या परिचिताने पाठविले म्हणून ते इतरांकडूनदेखील समोर ‘फॉरवर्ड’ होते. असे प्रकार दररोज घडत असतात. परंतु असे करणे हा प्रकार ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये येतो. २०१६ सालापासून नागपुरात ‘फेक न्यूज’संदर्भात विविध तक्रारी झाल्या व नागपूर पोलिसांनी एकूण १६ प्रकरणात गुन्हे दाखल केले. ‘सोशल मीडिया’वर वाऱ्याच्या गतीने अफवा पसरवणाऱ्यांना सध्या कायद्याचा धाक नाही. पोलिसांनी यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची मदत घ्यावी व अशा मनोवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, असे मत पारसे यांनी व्यक्त केले.