राष्ट्रवादीच्या नेत्यांना निर्देश : अंतर्गत वाद चव्हाट्यावर नकोयोगेश पांडे नागपूरपक्षांतर्गत दुफळी ही शहर राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी नवीन बाब नाही. मात्र मनपा निवडणुकांच्या तोंडावर गटबाजी दिसून येऊ नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश पक्षनेत्यांना प्रदेश पातळीवरून देण्यात आले आहेत. याअगोदर कितीही वाद झाले असले तरी आता निवडणुकांपर्यंत तरी अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर न आणता एकीने काम करण्याच्या सूचना प्रदेश कार्यकारिणीच्या नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.पक्षाच्या स्थापनेला १७ वर्षे झाली असली तरी अद्यापही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नागपूर शहरात हवा तसा प्रभाव दिसून येत नाही. सातत्याने कॉंग्रेससोबत आघाडी केल्यामुळे कार्यकर्त्यांना संधीच मिळाली नाही व त्यामुळे पक्ष वाढला नाही, अशी पक्ष पदाधिकाऱ्यांची भावना आहे. मात्र पक्षात त्याहून मोठी समस्या म्हणजे नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. शहराध्यक्ष अनिल देशमुख व माजी शहराध्यक्ष अजय पाटील यांच्या गटातील वाद अनेकदा समोर आला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला याचा चांगलाच फटका बसला होता. अगदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरदेखील या गटबाजीचे प्रदर्शन झाले. जर विदर्भात पक्षाचा जम वाढवायचा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत चांगली कामगिरी व्हायलाच हवी, यादृष्टीने पक्षश्रेष्ठींकडून रणनीती तयार करण्यात येत आहे. मात्र नागपूर महानगरपालिका निवडणुकांत अंतर्गत वादाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच याबाबत पुढाकार घेतला आहे. स्थानिक पक्ष पदाधिकाऱ्यांची त्यांनी काही दिवसांअगोदर बैठक घेतली. कुठल्याही परिस्थितीत निवडणुकांपर्यंत अंतर्गत वाद बाहेर आणू नका, असे स्पष्ट निर्देशच त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्याअगोदरदेखील गटातटाचे राजकारण स्पष्ट दिसून आले होते.भूतकाळ विसरून भविष्यकाळाकडे पाहायासंदर्भात सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारची बैठक झाली असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. निवडणुकांना सामोरे जाण्याअगोदर पक्षात एकी दिसली पाहिजे ही खरी बाब आहे. नागपुरात नेत्यांमध्ये अगोदर काही गैरसमज होते. पण आता ते दूर झाले आहेत. निवडणुका लक्षात घेता सर्वांना वाद विसरून एकदिलाने काम करण्याबाबत सांगण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मनपा निवडणुकांच्या तोंडावर गटबाजी टाळा
By admin | Updated: October 14, 2016 03:20 IST