अवनीच्या मुलीनेही अखेर साेडला प्राण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:54+5:302021-03-14T04:09:54+5:30
नाेव्हेंबर २०१८ मध्ये अवनीला ठार केल्यानंतर तिचे दाेन्ही शावक अनाथ झाले हाेते. नर शावक बेपत्ता झाले; पण मादी शावकाला ...

अवनीच्या मुलीनेही अखेर साेडला प्राण ()
नाेव्हेंबर २०१८ मध्ये अवनीला ठार केल्यानंतर तिचे दाेन्ही शावक अनाथ झाले हाेते. नर शावक बेपत्ता झाले; पण मादी शावकाला शाेधण्यात वन विभागाला यश आले हाेते. या मादी शावकाचे पीटीआरएफ-८४ असे नामकरण करण्यात आले. आई गेल्यानंतर तिला सक्षमपणे जगविण्याचे आव्हान विभागावर हाेते. वन विभागाने त्यानुसार मादी शावकाला पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या तितरामांगी येथे वन पिंजऱ्यातच ठेवले हाेते. वाघासारखीच शिकारीची क्षमता तिच्यात निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मानक तत्त्वानुसार तिला ट्रेनिंग देण्यात आले. तब्बल अडीच वर्षे या वन पिंजऱ्यात ठेवल्यावर खात्री पटल्यानंतर व्याघ्र प्राधिकरणाच्या परवानगीने पीटीआरएफ-८४ वाघिणीला यावर्षीच ५ मार्चला पेंच व्याघ्र प्रकल्पात निसर्गमुक्त करण्यात आले हाेते. त्यावेळी तिचे वय ३ वर्षे ४ महिन्यांचे हाेते. तिच्या हालचाली टिपण्यासाठी रेडिओ काॅलरही लावण्यात आले हाेते. जंगलात ती जर यशस्वीपणे वावरली तर वन विभागाला माेठे यश मिळाले असते आणि हा प्रयत्न भविष्यातील व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयाेगी पडला असता.
मात्र, त्यानंतर दाेनच दिवसांत जंगलातीलच एका वाघाशी पीटीआरएफ-८४ वाघिणीची झुंज झाल्याची माहिती समाेर आली. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तिची शाेधाशाेध केली. ८ मार्च राेजी पेंचच्या जंगलात गंभीर जखमी अवस्थेत ती सापडलीही. त्यानंतर पथकाने तातडीने तिला उपचार पिंजऱ्यात हलवून वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे उपचार सुरू केला गेला. तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. शनिवारी सकाळपासून मात्र तिची प्रकृती अधिकच खालावली हाेती. त्यामुळे डाॅक्टरांच्या टीमने तिला गाेरेवाड्याच्या उपचार केंद्रात हलविण्याची सूचना केली हाेती. त्यानुसार प्रक्रिया सुद्धा सुरू झाली. मात्र, रात्री १० वाजताच्या सुमारास अखेर तिचा श्वास थांबला. विभागाच्या सूत्रानुसार वाघिणीचे व्याघ्र प्राधिकरणाच्या निर्देशानुसार रविवारी शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मात्र, पीटीआरएफ-८४ च्या निधनाने अवनीचा वारसा संपल्याची हळहळ प्राणीप्रेमींकडून व्यक्त हाेत आहे.