२०० रुपयांसाठी झाला होता ऑटोरिक्षाचालकाचा खून ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:36+5:302021-03-13T04:13:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऑटोरिक्षाचालक अनिल बर्वेकर (३२) यांचा प्रवासभाड्याच्या २०० रुपयांसाठी झालेल्या वादात खून करण्यात आला. मजूर ...

२०० रुपयांसाठी झाला होता ऑटोरिक्षाचालकाचा खून ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑटोरिक्षाचालक अनिल बर्वेकर (३२) यांचा प्रवासभाड्याच्या २०० रुपयांसाठी झालेल्या वादात खून करण्यात आला. मजूर दाम्पत्याने त्यांचा खून केला. हुडकेश्वर पोलिसांनी या खुनाचा उलगडा करीत आरोपी मजूर दाम्पत्याला अटक केली आहे. अनंतराम लखन रजक (२५) आणित त्याची पत्नी अनिता रजक (२२, रा. सागर, मध्यप्रदेश) असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनुसार, नवनाथनगर येथील रहिवासी ऑटोरिक्षाचालक अनिल बर्वेकर यांचा आऊटर रिंगरोडजवळ गुरुवारी दुपारी खून करण्यात आला. डोक्यावर दगडाने वार करून त्यांना मारण्यात आले. ऑटोरिक्षाच्या क्रमांकावरून अनिलची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यात आरोपी दाम्पत्य ऑटोरिक्षात बसल्याचे आढळून आले. ते घटनास्थळाजवळच असलेल्या एका टाईल्सच्या कंपनीत आले होते. ऑटोरिक्षातून उतरल्यानंतर ते पायीच गेल्याने पोलीस त्यांच्या शोधात होते. थोड्या दूर अंतरावर पेट्रोल पंपाजवळ ते पोलिसांच्या हाती लागले. त्यांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी अनिलची हत्या केल्याची कबुली दिली. रजक दाम्पत्य १० दिवसांपूर्वीच कामाच्या शोधात सागर येथून नागपूरला आले. खरबी येथे भाड्याने राहण्याची तजवीज त्यांनी केली. यानंतर ते काम धुंडाळत होते. एका जणाने त्यांना टाईल्स कंपनीच्या मालकाचा मोबाईल क्रमांक दिला. त्याच्याकडे काम मागण्यासाठी ते आले होते.
अनंतराम हा दारूडा आहे. त्याने खरबीत मद्यपान केले. त्यानंतर पत्नीसोबत सामान घेऊन अनिल बर्वेकर यांच्या ऑटोरिक्षात बसला. त्याने २०० रुपये भाडे ठरविले. अनिलला कंपनीच्या मालकानेच पत्ता सांगितला. तिथे पोहोचल्यावर अनंतरामने काम करण्याची इच्छा दर्शविली. परंतु, तो मद्यधुंद असल्याचे पाहून कंपनीच्या मालकाने नकार दिला. यादरम्यान अनिल ताटकळत होता. यामुळे त्यांनी अनंतरामला तात्काळ भाड्याचे २०० रुपये देण्यास सांगितले. अनंतरामने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगताच दोघांत वाद झाला. मजूर दाम्पत्याचा मोबाईल व सामान ऑटोरिक्षात ठेवून अनिल थोड्या दूर अंतरावर जाऊन थांबला. आरोपी दाम्पत्याने त्याच्याजवळ जाऊन पुन्हा वाद घातला. अनिताही अनिलशी भांडू लागली. स्वत:पासून तिला दूर करण्यासाठी अनिलने धक्का दिला. त्यामुळे संतापलेल्या अनंतरामने दगड उचलून अनिलच्या डोक्यावर वार केला. ताे खाली कोसळला. त्यानंतर ऑटोरिक्षातून सामान घेऊन दोघेही रवाना झाले. डोक्यावर गंभीर वार झाल्याने अनिलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
बॉक्स
क्षणभराच्या संतापाने आयुष्य उद्ध्वस्त
ऑटोरिक्षाचालकाची हत्या करणाऱ्या दाम्पत्याकडे एक वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते. अनंतराम गावावरून थोडके पैसे घेऊन नागपूरला आला होता. काम नसल्याने त्याच पैशांतून दहा दिवसांपासून उदरनिर्वाह सुरू होता. त्याच्याकडे दोन-तीनशे रुपये वाचले होते. त्या पैशांतून त्याने चप्पल विकत घेतली व त्यानंतर मद्यपान केले. कंपनीत काम मिळाल्यास ॲडव्हान्स घेऊन अनिलला प्रवासभाडे देऊ, असा त्याने विचार केला होता. परंतु, एका क्षणाच्या संतापाने दोन कुटुंबेच उद्ध्वस्त झाली. त्याच्या कृत्याने अनिलच्या कुटुंबासमोरही उपासमीरीची वेळ आली आहे.