माणुसकी जपणारा सेवाव्रती आॅटोचालक
By Admin | Updated: January 7, 2017 02:55 IST2017-01-07T02:55:45+5:302017-01-07T02:55:45+5:30
आजच्या धकाधकीच्या व्यावहारिक जगात माणुसकी हरवत चालल्याचे चित्र सर्वत्र दिसते.

माणुसकी जपणारा सेवाव्रती आॅटोचालक
आॅटोच्या माध्यमातून गरजूंना मदत : सोनेगाव पोलिसांनी केला सत्कार
नागपूर : आजच्या धकाधकीच्या व्यावहारिक जगात माणुसकी हरवत चालल्याचे चित्र सर्वत्र दिसते. मात्र अशा नकारात्मक परिस्थितीत माणुसकीची वीण घट्ट बांधणारा माणूस म्हणजे आॅटोचालक दिलीप केशवराव इंगळे. पैसा नसला तरी कुठल्याही माध्यमातून गरजूंच्या मदतीची भावना महत्त्वाची आहे. हीच भावना असलेले दिलीप इंगळे गेल्या १५ वर्षांपासून बेवारस मृतदेह किंवा गरजू गर्भवती महिलांना कुठलाही मोबदला न मागता रुग्णालयात वाहून नेण्याचे काम करीत आहेत.
मृतदेह वाहून नेण्यास कोणतेही वाहनचालक सहसा तयार होत नाही. तयार झालेच तरी जादा पैसे मागतात. मृतांच्या परिजनांची अडचण ते समजून घेत नाहीत. त्यांचा तो व्यवसायच आहे. दिलीप इंगळे यांनी मात्र या व्यावहारिकतेला छेद दिला आणि अशा गरजू कुटुंबाच्या घरातील मृतदेह नि:शुल्कपणे नेण्याची सेवा सुरू केली. पोलिसांच्या सूचनेवरून बेवारस असलेल्या मृतदेहांनाही ते रुग्णालयात किंवा स्मशानभूमीत पोहचविण्याचे काम करतात. एवढेच नाही तर गरीब घरातील गर्भवती महिलांना रुग्णालयात पोहचवून देण्याचे काम ते करीत आहेत. यासाठी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा त्यांनी कधी बाळगली नाही. त्यांनी स्वत:च्या आॅटोवर मोबाईल क्रमांकासह उपक्रमाचे फलक लावून मदत देण्याचे आवाहन केले आहे. एका फोनवर अगदी शहराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात ते मदतीसीठी धावून जातात.
दिलीप इंगळे गेल्या २० वर्षांपासून आॅटो चालवितात. मात्र मृतांच्या कुटुंबीयांची अवस्था पाहून १५ वर्षांपूर्वी हे सेवाव्रत सुरू केल्याचे ते सांगतात. दिलीप हे त्यांची पत्नी तसेच दीक्षा व भूमी या दोन मुलींसह मानेवाडा परिसरात भाड्याच्या खोलीत राहतात. आॅटो हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. पुरेसा पैसा नाही. मात्र केवळ पैसा हेच मदतीचे साधन आहे असे नसून आपल्याजवळ असलेल्या कुठल्याही साधनाने फुलाच्या पाकळीची मदत लोकांना करता येते ही त्यांची भावना. त्यांनी सांगितलेली एक आठवण अशीच मर्मस्पर्शी आहे. हुडकेश्वर पोलिसांच्या सूचनेवरून एकदा रात्री २ वाजता ते आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह आणायला गेले. त्यावेळी मृताचा दहा-बारा वर्षांचा मुलगा व पोलीस शिपाई सोबत होते. मृतदेह मेडिकलमध्ये सोडून त्यांनी मुलाला पुन्हा घरी सोडले आणि परिस्थिती पाहून स्वत:जवळ असलेले ३०० रुपये त्या मुलाच्या हाती दिले. अशा अनेक घटना आठवणीत असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले ही माझी प्रेरणा आहे. त्यांनी फार मोठा त्याग या समाजासाठी केला आहे. बाबासाहेबांनी आपल्या कमाईचा एक भाग समाजासाठी खर्च करण्याचे आवाहन केले होते. माझ्याजवळ फार पैसा नाही, मात्र आॅटोच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची संधी माझ्याजवळ आहे. याच भावनेतून १५ वर्षांपासून हे कार्य प्रामाणिकपणे करीत आहे.
- दिलीप इंगळे
पोलीस मित्रांकडून इंगळे यांचा सत्कार
इंगळे यांच्या सेवाकार्याचा सन्मान म्हणून सोनेगाव पोलीस स्टेशन आणि पोलीस मित्र संघटनेतर्फे पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सोनेगाव पोलीस स्टेशन येथे झालेल्या सत्कार समारंभात पोलीस निरीक्षक संजय पांडे, पोलीस मित्र आशिष अटलोए, नीलेश नागोलकर, पोलीस अधिकारी काळे, लांडे तसेच इतर पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.