आॅटो मीटरची सक्ती सोमवारपासून

By Admin | Updated: August 29, 2014 01:02 IST2014-08-29T01:02:44+5:302014-08-29T01:02:44+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने १ सप्टेंबरपासून आॅटोरिक्षा मीटरने चालण्याची सक्ती केली आहे. याच्या अंमलबजावणीसाठी आरटीओने चार पथकांवर जबाबदारी दिली आहे.

Auto shutdown from Monday | आॅटो मीटरची सक्ती सोमवारपासून

आॅटो मीटरची सक्ती सोमवारपासून

चार पथकांकडून तपासणी : दोषींकडून तीन पट दंडाची वसुली
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने १ सप्टेंबरपासून आॅटोरिक्षा मीटरने चालण्याची सक्ती केली आहे. याच्या अंमलबजावणीसाठी आरटीओने चार पथकांवर जबाबदारी दिली आहे. यात दोषी आढळून येणाऱ्या आॅटोचालकावर तीन पट आर्थिक दंडाची वसुली केली जाणार आहे.
शहरात १९९० पासून ते आतापर्यंत सहावेळा आॅटोचालकांना मीटरने चालण्याची सक्ती करण्यात आली. परंतु, प्रत्येकवेळा ती बारगळली, हे विशेष. १ जानेवारी २०११ रोजी आॅटो मीटर सक्तीची विशेष मोहीम उघडली होती. परंतु, शहरातील आॅटोचालकांनी याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मीटरनुसार न चालणाऱ्या आॅटोचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. विनामीटर वाहतूक करणाऱ्या आणि मीटर नसलेल्या आॅटोंविरु द्ध कारवाई झाली. आॅटोचालक संघटनांनीही याच्याविरोधात बंद पुकारला होता. तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी यात लक्ष घातल्याने संप मागे घेण्यात आला. परंतु आॅटोचे मीटर बंदच राहिले. त्यानंतर २०१२ मध्ये पुन्हा नवीन दराचे टेरिफ कार्ड तयार करून मीटरची सक्ती करण्यात आली.
कारवाईचा धसका घेत काही दिवस आॅटो मीटरने चालले, परंतु पुढे ही मोहीम थंडबस्त्यात पडली. जून २०१३ मध्ये आरटीओने सर्व आॅटोरिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती केली. त्यामागे आॅटो मीटरने चालावे ही अपेक्षा होती. त्यावेळी तब्बल ५ हजार आॅटोरिक्षांनी इलेक्ट्रॉनिक मीटर बसविले. परंतु आजही आॅटोरिक्षा मीटरविनाच धावत आहे. दरम्यानच्या काळात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी, आरटीओ आणि विविध आॅटो संघटनांची बैठक घेऊन आॅटो मीटरने चालविण्यावर चर्चा केली. यावेळी संघटनांनी अवैध वाहतूक बंद केल्यास व प्रवासी भाड्याचे दर वाढविल्यास हे शक्य असल्याचे मत मांडले. बैठकीत १ सप्टेंबरपासून मीटर सक्ती करण्याचा आणि दोषी आढळून आल्यावर दीड पट दंड आकारणीचा निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)
तीन हजार रुपये दंड
आॅटोरिक्षा परवानाधारकाने मीटर प्रमाण न चालणे, सदोष मीटरचा वापर करणे, मीटर नसताना वाहन वापरणे, मीटर सील तुटलेले असताना वाहनाचा वापर करणे, खोटे दरपत्रक वाहनात ठेवणे आदी कारणांसाठी आॅटोचालकांवर सुधारीत दंडसूची अनुसार विभागीय कारवाई अंतर्गत दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी एक हजार तडजोड शुल्क आणि दोन हजार रुपये विभागीय कारवाई असे एकूण तीन हजार रुपये दंड राहील.
नवे टेरिफ कार्ड सोमवारपासून
आॅटोरिक्षाचे नवे टेरिफ कार्ड सोमवारपासून लागू होत आहे. यात पहिल्या प्रती किलोमीटरला १४ रुपये भाडे आकारण्यात येईल. उदा. प्रवाशाला दोन किलोमीटर प्रवास करायचा असेल तर त्याला २८ रुपये प्रवास भाडे पडेल. हे टेरिफ कार्ड आॅटोचालकांच्या फायद्याचे आहे. परंतु नागपुरात अनेक प्रवासी सीटनुसार प्रवास करतात. ते मीटरने कसे चालतील या अडचणीत आॅटोचालक सापडले आहेत.

Web Title: Auto shutdown from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.