अधिकाऱ्यांना हवे हॉटेलच!
By Admin | Updated: December 4, 2015 02:56 IST2015-12-04T02:56:03+5:302015-12-04T02:56:03+5:30
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवण्यासाठी नागपुरातील शासकीय कार्यालयातील यंत्रणा कामाला लागली आहे.

अधिकाऱ्यांना हवे हॉटेलच!
कर्मचाऱ्यांकडून कलेक्शन सुरू : स्थानिक अधिकारी लागले कामाला
गणेश हूड नागपूर
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवण्यासाठी नागपुरातील शासकीय कार्यालयातील यंत्रणा कामाला लागली आहे. सनदींची शाही व्यवस्था व्हावी यासाठी उपराजधानीतील अलिशान हॉटेलात बुकिंग सुरू आहे. अधिक ारी नाराज होऊ नयेत यासाठी चोख व्यवस्था करण्याच्या सूचना विभाग प्रमुखांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना केल्या आहेत. यामुळे वर्षभरातच शासकीय कार्यालयात निधी संकलनाची जुनी परंपरा पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे.
वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पराभव झाला. राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. युती सरकारला लगेच विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला सामोरे जावे लागले होते. युती सरकारने अधिवेशनासाठी मुंबईहून नागपुरात येणारे मंत्री व सनदी अधिकाऱ्यांनी अलिशान हॉटेलात वास्तव्य न करता शासकीय निवासस्थानी निवास करण्याची नवीन परंपरा सुरू केली होती. त्यामुळे काही मंत्री व अधिकाऱ्यांची इच्छा नसतानाही त्यांना रविभवन, नागभवन व विभागाच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम करावा लागला होता. यात गैरसोय झाल्याची अनेकांची तक्रार होती. परंतु या निर्णयामुळे नागपुरातील शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला होता. गेल्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता यावेळी अलिशान हॉटेलात व्यवस्था करण्याच्या सूचना वरिष्ठाकडून नागपुरातील अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे उपराजधानीतील शासकीय अधिकारी आपल्या वरिष्ठांची शाही व्यवस्था करण्याच्या कामाला लागले आहे. वर्षभरात युती सरकारला जुनीच व्यवस्था योग्य असल्याचा प्रत्यय आल्याची शासकीय कार्यालयात चर्चा आहे. अधिवेशन कालावधीत अधिकारी व कर्मचारी बड्या अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवण्यात व्यस्त असतात. विधिमंडळात उपस्थित करण्यात आलेले प्रश्न व लक्षवेधीची उत्तरे शोधण्याचे काम वगळता शासकीय कार्यालयात कामकाज ठप्पच असते. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत. त्यातच विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिका व जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
४६ कॉटेज व ८० सूट
रविभवन व नागभवन येथे ४६ कॉटेज व ८० सूट आहेत. रविभवन येथे कॅबिनेट मंत्री तर नागभवन येथील कॉटेज येथे राज्यमंत्र्यांच्या निवासाची व्यवस्था केली जाते. येथील उपलब्ध सूट व विविध विभागाच्या विश्रामगृहात अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था असते. परंतु येथील व्यवस्थेवर काही मंत्री व अधिकारी नाराज असल्याचे समजते.