आज निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST2021-09-27T04:08:39+5:302021-09-27T04:08:39+5:30

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारचा शेवटचा दिवस आहे. ...

Attention to those who withdrew from the election today | आज निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांकडे लक्ष

आज निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांकडे लक्ष

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोण अर्ज मागे घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे बंडखोरांना शांत करण्यासाठी नेत्यांकडून संपर्क करणे सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी १००, तर पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी १५६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये बंडोखोरी झाली आहे. सावरगाव सर्कलमध्ये माजी सभापती सतीश शिंदे यांच्या पत्नीने अपक्ष म्हणून दावेदारी दाखल केली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार उभा करून राष्ट्रवादीला धोका दिला होता. आता राष्ट्रवादीने एका सर्कलमध्ये काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. कुही तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कलचे तिकीट काँग्रेसला गेल्याने राष्ट्रवादीचे भागेश्वर फेंडर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

भाजपाचे विरोधी पक्ष नेते अनिल निदान यांना शेवटपर्यंत पक्षाने झुलवत ठेवल्याने, त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला नाही. परंतु भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांना अधिकृत उमेदवार घोषित केले आहे. तरीही त्यांना कमळ चिन्हाचा वापर करता येणार नाही. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी असली तरी नागपूरमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहे. दुसरीकडे काँग्रेसचे मंत्री निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. परंतु राष्ट्रवादीच्या गोटात शांतता आहे.

Web Title: Attention to those who withdrew from the election today