लग्नातील उपस्थिती ‘शंभरी’पार नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST2021-02-20T04:20:59+5:302021-02-20T04:20:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : डिसेंबर ते जानेवारीदरम्यान काेराेनाची साखळी तुटत असताना आता काेराेनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने संसर्गाचा ...

लग्नातील उपस्थिती ‘शंभरी’पार नको
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : डिसेंबर ते जानेवारीदरम्यान काेराेनाची साखळी तुटत असताना आता काेराेनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने संसर्गाचा धाेका वाढला आहे. असे असताना लग्न समारंभातील गर्दी कुठे हजार, तर कुठे दाेन हजाराचा आकडा पार करीत आहे. या बाबीची प्रशासनाने दखल घेतली असून, गर्दीची ‘शंभरी’ पार करणाऱ्या मंगल कार्यालयांना कारवाईचा इशारा दिला आहे.
लग्न समारंभातील नागरिकांच्या गर्दीतून कोरोनाला आमंत्रण मिळत आहे. याकडे लक्ष वेधत ‘लाेकमत’ने गुरुवारी (दि. १८) ग्रामीण भागात शुभमंगल 'सावधान' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने शहरातील सर्व मंगल कार्यालये व सेलिब्रेशन लॉन मालकांना लेखी आदेश व सूचना जारी केल्या आहेत.
लग्न समारंभात शंभरपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती असू नये, असे आढळल्यास हाॅल मालकास जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असेही आदेशित केले आहे. शिवाय, लग्न समारंभस्थळी प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे. सॅनिटायझरचा वापर, शारीरिक अंतर पाळावे, अशा सूचनाही मंगल कार्यालयांना दिल्याची माहिती तहसीलदार अनिरूध्द कांबळे यांनी दिली. गुरुवारी नगर पंचायत प्रशासनानेसुद्धा मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. याकरिता पाेलीस ठाणे परिसर व मुख्य मार्गावर नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच रस्त्याने विनामास्क फिरताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.