उपस्थिती नगण्य तरी विद्यार्थ्यांचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:09 IST2021-02-09T04:09:29+5:302021-02-09T04:09:29+5:30
१० महिन्यांनी शाळेचे दर्शन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग यशस्वी सुरू झाल्यानंतर ...

उपस्थिती नगण्य तरी विद्यार्थ्यांचा उत्साह
१० महिन्यांनी शाळेचे दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग यशस्वी सुरू झाल्यानंतर नागपुरात पाचवी ते आठवीच्या वर्गांनादेखील सोमवारपासून सुरुवात झाली. सुमारे १० महिन्याच्या कालावधीनंतर शाळेत आल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु अद्यापही ‘कोरोना’वर पूर्णत: नियंत्रण आले नसल्याने पहिल्या दिवशी शाळांमध्ये उपस्थितीचे प्रमाण कमी होते.
जिल्ह्यात ९ वी ते १२ वीचे ऑफलाईन वर्ग १४ डिसेंबर रोजी सुरू झाले. महापालिका आयुक्तांनी मनपा हद्दीतील शाळाही ४ जानेवारीपासून सुरू केल्या. ५ वी ते ८ वीपर्यंतच्या वर्गाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी मनपा क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार शाळांनी तयारी सुरू केली. वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्यात आला. काही शाळात रांगोळ्या काढून तर काही ठिकाणी ढोलताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोनाची धास्ती काही प्रमाणात अजूनही असल्याने बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती होती. शाळांमध्ये २५ ते ६० टक्के उपस्थिती नोंदविण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या तपासणीवर भर
शाळा स्वच्छता, निर्जंतुकीकरण, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटरने विद्यार्थ्यांची तपासणी इत्यादींवर भर देण्यात आला. मैदानामध्ये जास्त अंतरावर चौकटी आखून विद्यार्थ्यांना उभे करणे असे अनेकविध उपाय शाळांनी केले होते. शिक्षक व कर्मचाऱ्यांना यासंदर्भात अनेक ठिकाणी विशेष प्रशिक्षणदेखील देण्यात आले. शिवाय वर्गखोल्या व स्टाफ रूममध्येदेखील बैठक व्यवस्थेत ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात आले. दरम्यान, कोरोनामुळे सध्या शाळेचा कालावधी कमी राहणार आहे.
सत्राचे उरले दोनच महिने
‘कोरोना’मुळे यंदाच्या शैक्षणिक सत्राचे वर्ग ‘ऑनलाईन’ पद्धतीनेच झाले. बहुतांश विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. सत्र संपायला अवघे दोन महिने उरले आहेत. आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यानंतर दोन महिन्यात परीक्षा होतील का, असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत.