विद्यार्थिनींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
By Admin | Updated: November 22, 2014 02:40 IST2014-11-22T02:40:39+5:302014-11-22T02:40:39+5:30
शाळा सुटल्यानंतर घरी परत जाणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला.

विद्यार्थिनींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
नरखेड : शाळा सुटल्यानंतर घरी परत जाणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. तरुणाच्या सावधगिरीमुळे हा प्रयत्न फसला. ग्रामस्थांनी आरोपीस पकडून नरखेड पोलिसांच्या हवाली केली. ही घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वंडली शिवारात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
कपिल नरसिंह (२०, रा. परसोडी-दीक्षित, ता. नरखेड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. वंडली येथील दोन अल्पवयीन विद्यार्थिनी काटोल येथे रोज ये-जा करतात. त्या दोघेही काटोल येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असून त्यापैकी एक सहावीत तर दुसरी आठवीत आहे. वंडली येथे बस जात नसल्याने या दोघींनाही कलंभा येथून वंडलीला चार कि.मी. पायी जावे लागते.
शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर त्या दोघी बसने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कलंभा बसथांब्यावर उतरल्या. त्यांच्यासोबत अन्य दोन तरुणही या बसथांब्यावर उतरले. काही वेळाने आरोपी कपिल एमएच-४०/एएच-५९९८ क्रमांकाच्या मोटरसायकलने गोंडीदिग्रस येथून कलंभा बसथांब्यावर आला. येथे त्याने या विद्यार्थिनींना खंडाळ्याकडे जाणारा मार्ग विचारला. त्यावर आपण खंडाळा येथे राहात असल्याचे प्रशांत बागडे (२०) याने सांगितले.
कपिलने त्याला दुचाकीवर बसविले आणि खंडाळ्याच्या दिशेने निघून गेला. प्रशांतला वंडली फाट्यावर सोडून कपिल परत कलंभा बसथांब्यावर आला. त्याने या विद्यार्थिनींना वंडली येथे सोडून देण्याची बतावणी केली. अंधार झाल्याने या दोघींनी त्याच्यावर विश्वास ठेवला. या दोघींना घेऊन तो वंडलीकडे निघाला. मात्र, वंडली फाट्यावर वंडलीकडे न वळता तो सुसाट वेगाने खंडाळ्याकडे निघाला. त्याचवेळी प्रशांत खंडाळ्याकडे पायी जात असल्याचे या दोघींना दिसला. त्यांना ‘दादा आम्हाला वाचव’ अशी मदतीची याचना करीत दुचाकीवरून उड्या मारल्या. यात दोघेही किरकोळ जखमी झाल्या. प्रशांतने लगेच मोबाईलवरून खंडाळा व सिंगारखेडा येथील त्याच्या मित्रांना माहिती देत कपिलला अडविण्याच्या सूचना केल्या. कपिलला सिंगारखेडा येथे अडवून स्थानिक तरुणांनी नरखेड पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी सिंगारखेडा येथून आरोपीला ताब्यात घेतले.
माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी नरखेड पोलीस ठाण्याला भेट दिली. घटनास्थळ हे काटोल पोलीस ठाण्यांतर्गत असल्याने सदर घटनेचा तपास काटोल पोलिसांकडे देण्यात आला. ही कारवाई ठाणेदार दीपक गोतमारे, सुरेश निमखडे, श्रीनिवास वाघ, संजय शेंडे, राजेश मोरे, रविकांत डहाट, संजय इंगोले आदींनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)