दीक्षांत समारंभ ‘ग्लोबल’ करण्याचे प्रयत्न
By Admin | Updated: September 23, 2014 01:06 IST2014-09-23T01:06:30+5:302014-09-23T01:06:30+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ थाटात पार पाडावा, यासाठी प्रशासनाकडून पूर्ण जोर लावण्यात येत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनादेखील

दीक्षांत समारंभ ‘ग्लोबल’ करण्याचे प्रयत्न
नागपूर विद्यापीठ : इंटरनेटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ थाटात पार पाडावा, यासाठी प्रशासनाकडून पूर्ण जोर लावण्यात येत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनादेखील ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होता व्हावे यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यासंदर्भात प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याबद्दल निरनिराळे विकल्प तपासण्यात आले असून, हे करणे कितपत शक्य होईल यासंदर्भात सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.
या सोहळ्यास तीन हजारांहून अधिक निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. ‘डोम’चा आकार पाहता ठिकठिकाणी ‘एलसीडी स्क्रीन’ लावण्यात येणार आहेत. यासाठी कॅमेऱ्यांची व्यवस्था राहणारच आहे. मग याचाच उपयोग करून इंटरनेटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करणे शक्य आहे, अशी कल्पना अधिकाऱ्यांना सुचली. यासंदर्भात विद्यापीठाकडून निरनिराळ्या ‘एजन्सी’सोबत बोलणी सुरू असून विद्यापीठाचेच काम पाहणाऱ्या ‘प्रोमार्क’ची यासाठी मदत घेण्याची शक्यता आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचा नेमका निर्णय झाला नसला तरी याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लहान मुलांना ‘नो एन्ट्री’
या सोहळ्यादरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी प्रशासनाने लहान मुलांना कार्यक्रमस्थळी प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमपत्रिकेत या आशयाची ठळक सूचनाच देण्यात आली आहे.
या दीक्षांत समारंभात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यासोबतच अनेक ‘व्हीआयपी’ व्यक्ती येणार असल्याने सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळेच कॅमेरा, ब्रीफकेस, हॅन्डबॅग यांच्यासोबतच मोबाईल फोन व आयपॅडला आणू नये, अशा सूचनादेखील विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)