दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न!

By Admin | Updated: January 25, 2016 04:17 IST2016-01-25T04:17:48+5:302016-01-25T04:17:48+5:30

पाय आणि कमरेचे हाड मोडून अंतर्गत आणि बाह्य रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे चंद्रशेखर गिरडकर यांचा मृत्यू

Attempts to defend the guilty! | दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न!

दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न!

नागपूर : पाय आणि कमरेचे हाड मोडून अंतर्गत आणि बाह्य रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे चंद्रशेखर गिरडकर यांचा मृत्यू झाल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. परंतु या प्रकरणात दोषी कोण, हे सांगण्यास मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मधुकर परचंड यांनी तूर्तास नकार दिला आहे. यामुळे दोषींना पाठीशी घालण्याचा तर प्रयत्न होत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
१३ जानेवारी रोजी १२.१० वाजताच्या सुमारास पंचशील चौकात गिरडकर यांना अपघात झाला. १२ वाजून २० मिनिटांनी त्यांना मेयोत उपचारासाठी आणले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला वाचविण्यासाठी पहिला एक तास हा ‘गोल्डन अवर’ असतो. या एका तासात तत्काळ निदान करून आवश्यक वैद्यकीय सोयी उपलब्ध होणे आवश्यक असते. गिरडकर यांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन किमान सोनोग्राफी होणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही.
चौकशी समितीच्या अहवालातही ‘सोनोग्राफी’ झाली नसल्याचे समोर आले आहे. दुसरे म्हणजे, त्या रात्री कॅज्युल्टीमध्ये डॉक्टर नव्हते, असे गिरडकर यांचे नातेवाईक सांगतात, परंतु या संदर्भातील अहवालात नमूद असलेली माहिती सांगण्यास डॉ.परचंड यांनी नकार दिला आहे. त्यावेळी उपस्थित नातेवाईकांनुसार, फोन करून डॉक्टरांना बोलविण्यात आले.
केवळ पायावरच्या दुखापतीकडेच डॉक्टरांनी लक्ष केंद्रीत केले. गुडघ्यावर टाके लावण्यामध्येच दोन तास घालविले. उपचारासाठी महत्त्वाचा वेळ गेल्याने ते आणखी गंभीर होऊन मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

कंबरेचे हाड मोडले
४अधिष्ठाता डॉ. परचंड यांनी सांगितले, चौकशी समितीच्या अहवालात गिरडकर यांच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली होती. सोबतच त्यांच्या कमरेचे हाडही मोडले होते. यामुळे बाह्य व अंतर्गत झालेल्या अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला.
‘डीएमईआर’ने एवढेच बोलण्यास सांगितले
४डॉ. परचंड यांनी सांगितले, गिरडकर यांच्या मृत्यूशी संबंधित असलेला अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) सोमवारी पाठविण्यात येणार आहे. या संदर्भात संचालकांशी फोनवरून बोलणे झाले आहे. ‘डीएमईआरने’ कोणी दोषी आहे किंवा नाही, या संदर्भाची माहिती देण्यास मनाई केली आहे.

Web Title: Attempts to defend the guilty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.