दलित-बहुजनांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा संघाचा प्रयत्न

By Admin | Updated: October 14, 2015 03:27 IST2015-10-14T03:27:17+5:302015-10-14T03:27:17+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील काही विशिष्ट वर्गांसोबतच जुळला असून शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होत आहे.

Attempts to build trust among Dalit-Bahujans | दलित-बहुजनांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा संघाचा प्रयत्न

दलित-बहुजनांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा संघाचा प्रयत्न

शिक्षणप्रणालीत बाबासाहेबांच्या विचारांचा आग्रह : सामाजिक समरसतेकडे पाऊल
योगेश पांडे नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील काही विशिष्ट वर्गांसोबतच जुळला असून शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होत आहे. परंतु ही प्रतिमा दूर होऊन दलित-बहुजनांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी संघाचे पदाधिकारी आग्रही असून त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. संघ परिवारातील अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान याचेच प्रतिबिंब दिसून आले.
शिक्षणप्रणालीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण होऊन त्यांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव यावेळी संमत करण्यात आला.
देशात सत्तांतर झाल्यापासून संघाकडून सर्वात जास्त भर हा शिक्षणप्रणालीतील बदल व सामाजिक समरसता यांच्यावर देण्यात येत आहे. मार्चमध्ये नागपुरात झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सामाजिक समरसतेचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील वारंवार ‘एक गाव, एक पाणवठा’ तसेच सर्वांसाठी गावांमधील मंदिरे खुली व्हावीत यासारख्या बाबींना समर्थन दिले. संघ स्वयंसेवकांना सामाजिक समरसतेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यास सांगण्यात आले व त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नदेखील सुरू होते.
परंतु आरक्षणाचा फेरविचार व्हावा, या डॉ.भागवतांनी दिलेल्या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ माजली व संघ दलित-बहुजनविरोधी असल्याचा जोरदार प्रचार होऊ लागला. या वक्तव्यामुळे दलित-बहुजनांमध्ये निर्माण होत असलेल्या विश्वासाला तडा गेला असून तो परत मिळविणे संघासमोर आव्हान ठरणार आहे.
अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघातर्फे रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात ९ ते ११ आॅक्टोबरदरम्यान आयोजित अधिवेशनादरम्यान देशातील ‘केजी’पासून ते ‘पीजी’पर्यंतच्या शिक्षण प्रणालीत कोणते बदल हवेत यावर मंथन झाले. समाजातील सर्व घटकांपर्यंत भेदभाव दूर सारून समान शिक्षण कसे पोहोचेल या मुद्यावर यात सर्वात अधिक भर दिसून आला. एकात्ममानववाद निर्माण करणारी शिक्षणप्रणाली निर्माण करणे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे शिक्षणप्रणालीत अनुसरण करणे हे दोन महत्त्वाचे प्रस्ताव यावेळी संमत करण्यात आले. संघाचे काही पदाधिकारी अन् स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करणार
डॉ.आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार, त्यांची आवश्यकता, त्यांच्या विचारांतील दृष्टिकोन यांचा शिक्षणाच्या माध्यमातून यांचा जास्तीत जास्त प्रसार कसा होईल यावर सखोल मंथन झाले. सर्वांना समान संधी, वंचितांचा विकास याबाबत बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श शिक्षणप्रणालीत अंतर्भूत असावा असाच सूर दिसून आल्याची माहिती महासंघाचे महामंत्री जगदीश प्रसाद सिंघल यांनी दिली.

Web Title: Attempts to build trust among Dalit-Bahujans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.