वीज कापल्यामुळे संतप्त नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:09 IST2021-03-25T04:09:05+5:302021-03-25T04:09:05+5:30

विदर्भ राज्य आंदोलन समिती व पोलिसांनी वाचवले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज कनेक्शन कापल्यामुळे राजेश बंडे नावाच्या ...

Attempted self-immolation of angry citizen due to power outage () | वीज कापल्यामुळे संतप्त नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न ()

वीज कापल्यामुळे संतप्त नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न ()

विदर्भ राज्य आंदोलन समिती व पोलिसांनी वाचवले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीज कनेक्शन कापल्यामुळे राजेश बंडे नावाच्या एका संतप्त नागरिकाने बुधवारी महावितरणच्या कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते व पोलिसांनी मध्यस्थी करीत त्याची समजून काढून त्याला वाचवले.

मिळालेल्या माहितीनुसार राजेश बंड हे जुनी मंगळवारी येथे राहतात. त्यांच्या वडिलांच्या नावावर वीज कनेक्शन आहे. राजेश हे टिफीन पोहोचविण्याचे काम करतात. त्यांच्यावर कोरोना काळातील ६५ हजार रुपयाचे वीजबिल थकीत होते. महावितरणने आज त्यांचे वीज कनेक्शन कापले. दरम्यान राजेश हे घरी आले तेव्हा त्यांना वीज कनेक्शन कापल्याचे समजले. कुठलीही पूर्वसूचना न देता कनेक्शन कापल्याने ते संतापले होते. ते थेट महावितरणच्या वर्धमाननगर येथील उपविभागीय कार्यालयात जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना आपली व्यथा सांगितले. घरची परिस्थिती ठीक नाही. लहान मुली रात्रभर अंधारात कसे राहतील, असे सांगत लाइन जोडून देण्याची विनंती केली. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. अगोदर पैसे भरा नंतरच वीज जोडून मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे राजेश आणखीनच संतापले. ते कार्यालयाच्या बाहेर आले. महावितरण व सरकारच्या विराेधात घोषणा दिल्या आणि त्यांच्याजवळ असलेले रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून घेतले.

दुसरीकडे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते मागील अनेक दिवसांपासून वीज कनेक्शन तोडण्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यांना राजेशबद्दल माहिती मिळाली. ते सोबत रॉकेल घेऊन गेल्याचेही समजले. त्यामुळे मुकेश मासुरकरसह कार्यकर्ते त्यांना शाेधत वर्धमाननगरातील कार्यालयात पोहोचले. त्याचवेळी पोलीसही तिथे आले होते. तेव्हा बंड हे स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न करीत होते. कार्यकर्ते, पोलीस व कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना समजावले. त्यांच्या हातातून माचीस हिसकावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर पोलीस राजेश यांना आपल्यासाेबत घेऊन गेले.

चौकट

जाणीवपूर्वक प्रयत्न; पोलिसात तक्रार

उपरोक्त घटना ही जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा दावा महावितरणने केला आहे. यासंदर्भात महावितरणने म्हणणे आहे की, ६५,७१४ रुपये थकबाकी होती. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने नाइलाजास्तव वीज कनेक्शन कापण्यात आले. राजेश बंड हे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसोबत आले होते. ते वीजबिलाची रक्कम न भरता वीज जोडून देण्याची मागणी करीत होते. चर्चा करीत असतानाच त्यांनी आपल्या पिशवीतून बाटली काढली. त्यातील द्रव पदार्थ काढत आपल्या अंगावर टाकले. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांपैकी एकाने आगपेटी पेटवण्याचा प्रयत्न केला. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आगपेटी हिसकावून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी महावितरणकडून लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चौकट

लॉकडाऊन काळात कनेक्शन कापलेच कसे?

ग्राहक व कार्यकर्त्यांनी मिळून जाणीवपूर्वक हा सर्व प्रकार केल्याचे महावितरण सांगत असले तरी लॉकडाऊन काळात वीज कनेक्शन कापणे बंद आहे. ऊर्जामंत्र्यांनी तशी घोषणाही केली आहे. असे असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन काळात कनेक्शन कापलेच कसे, असा प्रश्नही विचारला जात आहे.

Web Title: Attempted self-immolation of angry citizen due to power outage ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.